Wednesday, August 28, 2013

अवनी - पाळणा-२


नभातुनी  आली घरी एक परी पाहुणी
पाळण्यात जोजवा ग अंगाई गाउनी

विवाह समयी पहावी ती आकाशी तारका
सुगंधित तेजस्वी तारयासम मिळता तो  सखा
तेजपुंज उल्का जन्मली दिपली ग अवनी

संसाराची वेल फुलवी अरुंधती सौरभ
कळी उमलली ह्या वेलीवर बहरले वैभव
मन गेले मोहरूनी आनंदे नाहुनी

अखंडित राहो तुजवरी अंबेची ग कृपा
मागणे हे  हेचि करितो नरसिंह रे नृपा
सिद्धीविनायका होवो कन्या हि सुगुणी
नभातुनी  आली घरी एक परी पाहुणी
पाळण्यात जोजवा ग अंगाई गाउनी

---प्रसाद 

अवनी - पाळणा १

आधीच्या काही गाण्यांमध्ये आमच्या मुला साठी (अनिरुद्ध ) आणि मुली साठी (अरुंधती)  केलेले पाळणे होते. आता खालील पाळणा नाती साठी --------अवनी -अरुंधती-सौरभ ची कन्या
(चाल : भरजरी ग पितांबर दिला फाडून ---चित्रपट : श्यामची आई )

सये ग पाळणा हा हलकेच जोजवी
पाळण्यात ठेवियली पाहुणी नवी II ध्रु  II 

 मार्गशीर्ष मास कृष्ण एकादशी
चंद्र येई, गगनी सांजवात जशी
ऐश्या शुभ समयी लक्षुमीच्या पाउली
आलीस अन झाली अरुंधती माउली
कन्या ही सौरभास बहुत हर्षवी
पाळण्यात ठेवियली पाहुणी नवी
 
गोजिरे साजिरे रूप भाळी मनास
इवलेसे डोळे परी तेज तयात
मऊ मऊ बोटांचा स्पर्श तो होता
उरी वात्सल्याचा आनंद मोठा
हसून गालात ही आम्हास हसवी
पाळण्यात ठेवियली पाहुणी नवी
 
एक गालावरी बोट, एक इवल्या ओठांशी
जगी मी होणार आहे मोठी विदुषी
सांगतेस का असे? होउदेच तसे
अंबेची तुजवरी कृपादृष्टी असे
वसंतात फुललेली ही नाजूक पालवी
पाळ्यांत ठेवियली पाहुणी नवी
 
सोनियाचा दिन हा, उगवला आज
पाळण्यासी चढविला सुमनांचा साज
नामकरण सोहळा हा विश्व भुवनी
सांगती नाव हिचे ठेविले अवनी
अंगाई गात हिला माय निजवी
पाळ्यांत ठेवियली पाहुणी नवी

--प्रसाद 

Thursday, April 12, 2012

तृष्णेचा बळी


स्टार माझा वर काल ( ११ एप्रिल २०१२)    एक बातमी पहिली त्या बातमी वर आधारित मनात ही कविता आली. आपण हि ही बातमी पहिली तर मनास वेदना होतात. लोकांनी हेल्मेट घातलेले माकड अशी केलेली टिपणी मात्र संताप निर्माण करते.

http://www.umovietv.com/Video/watch.aspx?v=News&i=qezhuc9ZnEY&s=Yavatmal%20Monkey%20Trapped..
तृष्णेचा बळी
ऋतू चक्रातून आला तो  ग्रीष्म
नभी आग भडके तापले ते अश्म
विदर्भात  त्यातून तीव्रता ती भारी
जाळूनी जळाला  आसमंतात सारी

नदी नाले ओढे कोरडे तलाव
प्रतिवर्षी सृष्टी का खेळे हा डाव
भावी ऋतूचा जरी हा  सु हेतू
परी आता जैसे  ग्रासती राहू केतू

जीवन म्हणजे काय ह्या प्रश्ना
उत्तर सोपे लागता ती तृष्णा
एकेका थेंबासाठी  करीत पाणी पाणी
शोधाया  चहूकडे धावती सर्व प्राणी

अशाच त्यात एका मर्कटाचा तान्हुला
पिण्यासाठी पाणी व्याकूळ तो झाला
तहानलेला तो मुका बाळ जीव
गावात एका धावला ओलांडून शीव

स्वैर फिरता फिरता पोर तो रडवा
कुठेतरी दिसला एक छोटसा गडवा
पाण्याची चाहूल लागली त्यास त्यात
चार थेंबच होते साठले तळात

हुशार कावळ्याची गोष्ट नसे त्यास ज्ञात
खुपसले पाण्यासाठी अपुले तोंड गडवयात
हाय परी ह्याचा झाला  भलताच  विपर्यास
अडकले तोंड त्यात जसा पडला गळी फास

शोधत पाठी आली लेकराची ही माय
तिच्यासाठी पिल्लू दुधावरची ती साय
कसे काय सोडवू  केले बहुत  कयास
व्यर्थ परी ठरले सारे तिचे सायास

उराशी धरिले फुटला वात्सल्याचा पान्हा
गडवयासहित बिलगला आईला कान्हा
दृश्य ते पाहुनी धावले मनुष्य प्राणी
जाणिली न तिने परी त्यांच्या मदतीची वाणी

जवळी न कोणा येऊ देई जराशी
पळे दूर  बाळाला घेउनी उराशी
खाता न येई पिलाचे गडवयात तोंड
पाण्यासाठी अडकली अशी गळ्यात धोंड

असे उलटले  नऊ दिसा मागुनी दिस
दया मग आली त्या क्रूर नियतीस
जगण्याची आता व्यर्थ झाली शर्थ
निपचित झाले पिल्लू उरला न देही अर्थ

--प्रसाद शुक्ल

Thursday, March 29, 2012

माझ्या मनातील माझी कविता


जेंव्हा आमचे कवी-मित्र केदार मेहंदळे ह्यांनी माझ्या एका कवितेवर टिप्पणी केली त्याला उत्तर देताना खालील भावना मी व्यक्त केल्या


मनातील तरंग जेंव्हा शब्दात येतात
शब्द जेंव्हा छन्दोबद्ध होतात
तिथेच कविता होते  साकार
अन कागदावर घेते आकार

काही कवितांचा जन्म कल्पनेतून होतो
काही कविता आपण अनुभवलेल्या असतो
तो अनुभव स्वतःचा असेल वा भोवतालचा
असेल उद्याचा किंवा आजचा वा तो कालचा

काही कविता आपण जगलेल्या असतो
जगण्यातून कविता सुचते
कवितेतून जगणे रुचते
आणि अशी जगलेली कविता
नेहमीच मनात घर करून राहते

----प्रसाद शुक्ल

चंदेरी रात


तो: चंदेरी रात प्रिये तुझी साथ
      प्रीतीची ग बरसात साजणी
      प्रीतीची ग बरसात
ती: चंदेरी रात प्रिया तुझी साथ
      प्रीतीची रे  बरसात साजणा
      प्रीतीची रे  बरसात

तो: चांदाच्या किरणावारी झुलव शृंगाराचा तू झुला
ती: स्वच्छंदी भ्रमरापरी फुलव हलके हलके तू मला
     घेशी चुंबने अगणित जितक्या चांदण्या रे गगनात
      सखया प्रीतीची रे बरसात

तो: डोंगर कपारीत वाहती खळखळ प्रणयाचे झरे
ती: नाद हा जरी एकांती होई मन माझे रे लाजरे
      झुकती खाली पापण्या धरता मधुघट तू अधरात
      सखया प्रीतीची रे बरसात

ती:  बाहुपाशात तुझ्या तनुवरी रोमांचाची नर्तने
       नाचे यौवन मयुरी होती मिलनाची आवर्तने
तो: अशीच रजनी बहरेल जोवरी तृप्ती दिसे नयनात
      सखये प्रीतीची ग बरसात


---प्रसाद शुक्ल


     

प्रेम प्रेम प्रेम

प्रेम प्रेम प्रेम
काय ही गोष्ट असे
अनुभवा वाचुनी
ते काही कळणार नसे

प्रेम प्रेम प्रेम
बघून नाही दिसणार
ऐकावे म्हणावे तरी
श्रुतीला ना  भावणार

प्रेम प्रेम प्रेम
जिव्हेवरी चाखता न येई
गंध त्याचा नासिकेत
हुंगता जाणार नाही

प्रेम प्रेम प्रेम
कसा करणार त्यास स्पर्श
फुलवता फुलणार नाही
रोमांचाचा मनात हर्ष

प्रेम देऊ म्हटले तरी
मनासारखा घेणारा पाहिजे
प्रेम घेऊ म्हटले तरी
मनासारखा देणारा पाहिजे

घेणे-देणे वा देणे-घेणे
परिणाम ह्याचा जी अनुभूती
प्रेम बसणे प्रेम होणे प्रेम करणे
जमुनी ह्या येतात कृती
\
ह्या कृतींचे उद्दीपन
पेमिक फक्त जाणतील
प्रेमाचे अस्तित्व प्रेमाने
पंचेन्द्रीयांनी भोगतील

प्रेम प्रेम प्रेम
उमजणार नाही वाचून
एकदातरी उधळा ते
नका मनात ठेवू साचून

--प्रसाद शुक्ल

Thursday, March 22, 2012

पाळणा -२

पाळणा -२ -- आमच्या चिरंजीवांच्या बारशाच्या वेळेस -

( चाल -- भरजरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण 
                चित्रपट - श्यामची आई )


हलकेच जोजवा ग सयांनो पाळणा
पाळण्यात ठेवियला नवा पाहुणा
 
श्रावण ग मास तो, शुद्ध नवमी
पहाटेचा समय ग  तो चंद्र गगनी
सुखावली माउली ती पुत्र दर्शना
पाळण्यात ठेवियला नवा पाहुणा
 
अरुंधती बहिण ह्याची शोभे भाग्याची
पाठीवरी हिच्या मारा थाप कुंकाची
ताई म्हणविता मनी हर्ष मावेना
पाळण्यात ठेवियला नवा पाहुणा
 
दीपाच्या उदरी पहिली जन्मते ज्योती
ज्योती मागुनी किरण येई संगती
अनिरुद्ध हाचि किरण शुक्ल सदना
पाळण्यात ठेवियला नवा पाहुणा
 
सोनियाचा दिन हा, उगवला आज
पाळण्यासी चढविला सुमनांचा साज
आप्त-इष्ट जमले ह्या नामकरणा
पाळण्यात ठेवियला नवा पाहुणा
 
--प्रसाद शुक्ल
आरती -रेणुकेची

आमची कुलदेवता -रेणुका (माहूर) . शिवरायांच्या जन्मभूमी जुन्नर येथे देवीचे देऊळ आहे - ग्रामदैवत!  तेथील आम्ही पुजारी. माझ्या कडे एक जुने दस्तऐवज आहे - अर्धे मोडी लिपी मध्ये आहे व अर्धे पर्शियन भाषेत - जे मी बाबासाहेब पुरंदरे ह्यांच्याकडून वाचून घेतले.  १५५० साल चे आहे. त्यात आम्हाला बादशहाने ( during Moghul rule) जुन्नर व  आसपास च्या गावांचे पौरोहित्य करण्याचे अधिकार दिले असा मजकूर आहे.
माझा जन्म रेणुका देवीला नवस केल्याने झाला म्हणून माझे नाव प्रसाद. त्या आमच्या कुलदेवीची - रेणुकेची ही आरती.

( चाल पारंपारिक -- जय जगदीश हरे --)

जय जय रेणुके माते जय जय रेणुके
शरण मी तुझ्या चरणी, आशीर्वाद दे
जय जय रेणुके

तुझ्या रूपे लक्ष्मी, पाहतो सरस्वती
आकार तूच दे ग , आधार तूच दे ग माझ्या जीवनी
जय जय रेणुके

पुण्याचे होवोत पर्वत, पाप विलीन धरणी
तन मन धन ग माझे लागो सत-करणी
जय जय रेणुके

विसर न व्हावा तुझा मजला हीच बुद्धी देई
तुझे नाम सदा मुखी हीच इच्छा हृदयी
जय जय रेणुके

लाभो सर्वा सुख समृद्धी हीच  विनंती
करितो ग प्रसादे, परशुराम जननी
जय जय रेणुके

--प्रसाद ( उर्फ परशुराम) शुक्ल



पाळणा -१

पाळणा -१ कन्येच्या बारशाच्या वेळी  ( चाल पारंपारिक - बाळा जो जो रे)

बाळा जो जो रे, कुलभूषणा
परशुराम दुहिता, बाळा जो जो रे

लाविली दीपाने कुलज्योती, दिवाळीच्या मुहूर्ती
मिळवी तू कीर्ती , तेजाने दिपवी सारी धरती
बाळा जो जो रे

तुझ्याच वेलीवर हे अंबे, आले सुंदर फुल
सदैव राहूदे तिजवरी तव मायेची झूल
बाळा जो जो रे

लाडक्या नातीचे कौतक करी प्रभावती
दुधावरची साय म्हणोनी आजोबा तुज जपती
बाळा जो जो रे

हर्ष जाहला आजोळी, फुलली नाजूक कळी
करांच्या हिंदोळी, कौतुक प्रत्येकाचे डोळी
बाळा जो जो रे

सुमन आत्याने सांगितले नाव अरुंधती
सोनियाचे क्षण आजला कौतुके नाहिती
बाळा जो जो रे

---प्रसाद (उर्फ परशुराम ) शुक्ल

ओली चिंब तू

पावसात ह्या, ओली चिंब तू
केसात तुझ्या, झेली थेंब तू
सारीत बाजूला त्या अवखळ बटा
जाणून घेऊ दे तुझ्या नजरेतील छटा
प्रतिसाद दे मला राहुनी संग तू
पावसात ह्या, ओली चिंब तू
 
ओली वसने हि, बिलगली ग तुला
मनी उफाळला त्यांचा मत्सर मला
रेखीव तनुवरी फुललेले आकार
डोळ्यात माझ्या होती साकार
मदिरेचे पेले सहस्त्र,  ऐसी झिंग तू
पावसात ह्या, ओली चिंब तू
 
जरी हवेत गारवा   मनी  मी तापलो
घुमे मदनाचा पारवा तनी ओला जाहलो
सांगती आता तुझ्या अधरांची स्पंदने
मिठीत मोकळी कर सारी बंधने
शृंगाराच्या ऐन्यातले यौवन बिंब तू
पावसात ह्या, ओली चिंब तू
 
---प्रसाद शुक्ल

Tuesday, March 20, 2012

पहिली भेट


सांग रे सांग रे मना
फुले का बहरली, चंद्र का हासला
थांब रे थांब रे मना
आसमंत हा मज स्वर्ग का भासला

हे कोकिळे हे कोकिळे
संगीताच्या डहाळीवर एक गा ग गोड गीत
रस वाटू दे ग त्याला माझ्या प्रीत संगतीत
पहिलीच माझी त्याची भेट घडे हि आजला

अग सरिते अग सरिते
खळखळून धावू नको मन माझे हि धावते
गोंधळून गेले कि मी माझी न मी राहते
आधीच माझा  जीव गोड भीतीने ग्रासला

रे राजहंसा रे राजहंसा
प्रेमात त्याच्याशी मी बोलू रे कसे
दृष्टीला लावूनी दृष्टी, का लाजतसे
सांग न लवकरी जवळी तो आला

---प्रसाद शुक्ल

अभागी मी


जा जा जा रे रातच्या राजा जा
जेथे असेल प्रीतीची बरसात
तेथे तू जा

होती माझ्या भाळ अंगणी
चमचम करीत एक चांदणी
पुनवेच्या ह्या शीतल रात्री
नाही फक्त तीच एकटी
तू हि जा तू हि जा रातच्या राजा जा

उजाड ह्या डोंगर माथी
वाट पाहू मी कोणासाठी
तुटलेल्या ह्या फांदीवरती
रानफुले हि येत नसती
गुलाबाच्या रे सुंदर फुला
तुही सुकून जा सुकून जा

---प्रसाद शुक्ल

अल्लड प्रेम

तो: प्रेम बसले माझे तुझ्यावर
     तुझे माझ्यावर मी काय करू

ती:   त्या चांदण्या अन सागर मोती
       राजा तू घेउनी ये हाती
       हट्ट करणारी मी ती राणी 
       आता तूच माझा रे कल्पतरू
      काय करू काय काय करू
      प्रेम बसले माझे तुझ्यावर
     तुझे माझ्यावर मी काय करू

तो: हि रात्र सुंदर , तुही सुंदर
     बोलावतो सुंदर समिंदर
     मऊ मऊ ह्या रेतीवारुनी
     आपण दोघे खूप फिरू
    काय करू काय काय करू

तो ती : प्रेम बसले माझे तुझ्यावर
      तुझे माझ्यावर मी काय करू

---प्रसाद शुक्ल
     

निधन

प्राण्यांनाही भावना आहेत --

मरुनी पडता आपुली कलत्र
अश्रू ढाळती मुके दोन नेत्र

उमजत नाही का हि मेली
एकलीच स्वर्गामध्ये गेली
सोडूनी माझे छत्र

जन्मभरी दिधली मज प्रीती
जगाच्या रंगभूमी वरती
गळाले हे एक पात्र

--प्रसाद शुक्ल

Monday, March 19, 2012

लग्न ठरल्यावर


किती दिवस अजुनी मी बोलावे तुझ्या प्रतीमेसवे
दिनरात तुज स्वप्नी पहावे का ते ठरावे वावगे

त्या दिनी आला होतास पाहण्यास तू मला
तुजकडे बघण्याचा मजसी धीर न रे झाला
खाली मान घालूनी तुझ्या सामोरी मी बैसले
उंचावूनी पापण्या तरी एकदाच तुला पाहिले
तेंव्हाच आले रे मनी तुझीच होऊनी मी जावे

मनात माझ्या भरले तुझे ते व्यक्तिमत्व देखणे
छंद फक्त आताची तो मज  संसाराचे चित्र रेखणे
नयनात तुझ्या मी आता जेंव्हा पाहते एकटक
भेटण्यास तुजसी सखया मन होते रे अगतिक
पाहण्यास मी अधीर झाले गोड गुलाबी विश्व नवे

वाचते आता मी कधी एखादी सुरस प्रणय कथा
ती तुझी-माझीच आहे असे वाटते मजसी नाथा
लाजुनी हसते मनी मी आता ऐकता प्रेमगीत
वाटे त्या गीतातुनी वर्णिली तुझी माझी प्रीत
उडती मनाच्या गगनात, स्वच्छंदी स्वप्नांचे रे थवे


--प्रसाद शुक्ल


लावणी: गुलाब

राया गेल्या श्रावणात, खास येउनी लाडात
तुम्ही दिल माझ्या हातात एक कलम गुलाबाच
जपून नेल मी घरी, लावलं पुढच्या दारी
नित्य ओतल्या घागरी, खत घातलं प्रेमाच
झाल आता वर्ष , सांगण्यास होतो हर्ष
सुखावतो रोज स्पर्श बहरलेल्या ताटव्याचा
सय येती तुमची फार तुम्ही याव एकवार
पाणी गुलाबच गार अन ठेविला फाया अत्तराचा

राया या हो एकदा घरी
नजर टाकावी गुलाबावरी  -धृ

येता तुम्ही अंगणात गुलाब भरेल नजरेत
येईल तुमच्या मनात हळूच लावावा हात
रंग लाल मोहक परी छटा थोडी त्यात केशरी
राया या हो --

टपोर एखाद फुल घालेल तुम्हासी भूल
टाकुनी पुढती पाऊल तोडाव तुम्ही खुशाल
घ्यावी खबरदारी तरी झाड आहे ते काटेरी
राया या हो --

एकदा पहाव गुलाबाकडे, एकदा हो मजकडे
मग भाव मनी दडे दोन्ही वरी प्रीत हो जडे
खोचावा  माझ्या केसात आवडेल तुम्हाला भारी
राया या हो --

---प्रसाद शुक्ल


Thursday, March 15, 2012

अंगाई - नीज

माझ्या चिमुकल्या कन्येसाठी --आणि हो नंतर माझ्या चिमुकल्या चिरंजीवास हि म्हणत असे

चांदण्यांचा थवा बाई जमला ग गगनात
नीज लाडके तू आता किती हाससी गालात

सकाळीच येई दारी चिवचिव करी जी चिमणी
घरट्यात गेली ती ग मिटे डोळ्यांची पापणी
घेई पिलाल्या आपल्या उबदार ती पंखात
नीज लाडके तू आता किती हाससी गालात

दिसभर बागडूनी मनीमाऊ ती दमली
कोपऱ्यात जाऊनीया अंग चोरून निजली
मावशी ग ती वाघाची राहतो जो वनात
नीज लाडके तू आता किती हाससी गालात

झुलावती ग फुलांना वेलीवरची ती पाने
नभातून चंद्र त्यांना गाई अंगाईचे गाणे
गवताच्या पात्यावारी वारा नाचतो तालात
नीज लाडके तू आता किती हाससी गालात

इवल्या इवल्या डोळ्यातुनी पुरे पाहणे ते आता
अजून तू जागी कशी जग सारे झोपी जाता
रमुनी तू जाई बाई गोड सुंदर स्वप्नात
नीज लाडके तू आता किती हाससी गालात



---प्रसाद शुक्ल

अंगाई : पाहुणी

आमच्या छोट्याश्या घरात -आमच्या कन्येचे आगमन झाले तेंव्हा ---

कार्तिक शुद्ध द्वितीयेला , दिवाळीच्या संध्याकाली
घरट्यात चिमुकल्या एका पाहुणी नवी हो आली
जो जो जो बाळा जो जो जो

लपलेल्या किरणाशी जोडण्यास नूतन नाती
दीपाच्या उदरी पहिली जन्मली तेजोमय ज्योती
हिच्या दिव्या प्रकाशात अवघी अवनी ती दिपली
घरट्यात चिमुकल्या एका पाहुणी नवी हो आली
जो जो जो बाळा जो जो जो

ते गोजिरवाणे रूप बघतची राहावे वाटे
भावना वात्सल्याची अंतरी उफाळून दाटे
आनंद  तो स्वर्गीचा स्पर्शता बोटे ती इवली
घरट्यात चिमुकल्या एका पाहुणी नवी हो आली
जो जो जो बाळा जो जो जो

आजीआजोबांची हिजवरी आभाळा एवढी माया
चांदण्यात कौतुकाच्या उजळते नाजूक काया
हिज चुंबी वरचेवरी पदरी घेई माउली
घरट्यात चिमुकल्या एका पाहुणी नवी हो आली
जो जो जो बाळा जो जो जो

मऊ कापसाची गादी निजण्यास हिजसाठी
ठेविली डोईखाली मखमली  उशी  ती छोटी
रंगीत पाळण्यास रेशीम दोरी बांधिली
 घरट्यात चिमुकल्या एका पाहुणी नवी हो आली
जो जो जो बाळा जो जो जो

--प्रसाद शुक्ल

डोहाळे

सोहळा हा माझा डोहाळे पुरवायला
सयांनो मी निघाले ग माहेराला

हिरवी चोळी हिरवी साडी
भरली फुलांची ग वाडी
सासू आली माझी ओटी भरायला
सयांनो मी निघाले ग माहेराला

गालावर लाली नाही
पांढरे ग ओठ बाई
आळस हा अतिशय अंगात ग भरला
सयांनो मी निघाले ग माहेराला

भजी केली घोसाळ्याची
कोशिंबीर ती कांद्याची
मोतीचूर पंगतीला ग वाढीला
सयांनो मी निघाले ग माहेराला

आप्त इष्ट सारे जमती
आनंदे कौतुक करिती
अंबेच्या कृपेने सोनियाचा दिस दिसला
सयांनो मी निघाले ग माहेराला

---प्रसाद शुक्ल

एक सुंदर भेट

आमच्या पहिल्या बाळाची चाहूल बायको कडून जेंव्हा समजली - तेंव्हा सुचलेली हि कविता

तुला मी देणार आहे रे
एक सुंदर भेट
हृदयाशी तू धरशील सखया
अनेक चुंबने घेत

गुलाब कालिके परी ती मोहक
लाख हिर्‍यांहूनी ती रे मौलिक
पुढील स्वप्नांची ती प्रेरक
सांगितल्या विन  तू रे ओळख
गोड गुपित आहे ते माझे
सांगू कसे तुज थेट
तुला मी देणार आहे रे
एक सुंदर भेट

लाडे लाडे म्हणोनी साजणी
केली होती मज जवळी मागणी
ओढुनी परी लज्जेची ओढणी
अबोल राहिले मी त्या क्षणी
अजुनी जरा धीर धर रे
लवकरीच तुझ्या हाती आहे देत
हृदयाशी तू धरशील सखया
अनेक चुंबने घेत

---प्रसाद शुक्ल