Tuesday, March 13, 2012

निरोप

मी जेंव्हा पहिल्यांदाच परदेशी - अमेरिकेस गेलो होतो -तेंव्हा माझे वडील आजारी होते - मी एकुलता एक असल्याने त्यांना काळजी वाटत होती . आमचे कन्यारत्न फक्त दोनच महिन्यांचे होते. तेंव्हा internet तर नाहीच पण फोन सुविधा पण फार प्रगत नव्हती.   त्यावेळेस लिहिलेली ही कविता आहे

चाललो मी परदेशी, निरोप तुमचा घेतो
साऱ्या शुभेच्छा तुमच्या संगे मी घेउनी जातो

चाललो मी परदेशी  रडता असे का  तात
सहाच महिन्यांनी कि येणार आहे मी परत

चाललो मी परदेशी, काळजी ती नाही कशाची
असता पाठीमागे हो माझी माय धीराची

चाललो मी परदेशी, सांगतो मम प्रिय कांता
मम हृदयातील तव स्मृती तारून नेईल भ्रमंता

आपुल्या हाती ग आला फणसाचा मधुर हा कापा
ओठांवरी राहील माझ्या त्याचाच सदैव पापा

चाललो मी परदेशी अंबे तव स्पर्शितो चरण
धावुनी तू येई माते करताच तुझे ग स्मरण

चाललो मी परदेशी, निरोप तुमचा घेतो
साऱ्या शुभेच्छा तुमच्या संगे मी घेउनी जातो


----प्रसाद शुक्ल

सावज

तुझ्या चंचल मनाचे अखेर
मी हि एक सावज रे

तुजकडे बघुनी यौवन फुलले
तुझ्या मधुर शब्दांना भुलले
दिनरात तुझ्या कवेत झुलले
घेउनी मातेचा शाप
एकलेच ते आता रे

का धरावा तुजवरी मी रोष
देते मी माझ्या मनास दोष
का पडला त्यास प्रणयाचा शोष
माहित असुनी धावले ते
मृगजळा कडे रे

ठेवुनी तुझ्या वर फुका विश्वास
तुझ्या श्वासात मिसळला मी श्वास
रोखू न शकले वासनेच्या अश्वास
ठेउनी मागे पाऊल खुणा
दौडत पुढे गेला रे

---प्रसाद शुक्ल

शापित मधुचंद्र

काही वर्षांपूर्वी भावना ह्या दिवाळी अंकात -माझी "तृप्ती"  ही कथा प्रकाशित झाली होती. त्या कथेवर सुचलेले हे गीत आहे.

ये रे ये तू ये सजणा अधीर मी झाले रे सजणा
तूच माझी पूर्ण कर रे अंतरीची कामना
ये रे ये तू ये सजणा

पहिल्या रात्री गगनी होती चंद्राची अर्धी कला
मधुचंद्र हि तो अर्धा सखया राहिला रे आपला
कोंडल्या हृदयात माझ्या प्रणयाच्या अगतिक भावना
ये रे ये तू ये सजणा

तू माझा रे मी तुझी रे मंगल मणी माझ्या गळा
प्राजक्ताच्या फुलापरी स्वप्ने मी केली गोळा
वाहू मी ती आता कोणा सांग रे तुझ्या विना
ये रे ये तू ये सजणा

अंगार फुलविते आता ते पुनवेच चांदण शीतल
एकदाच मजवरुनी फिरव ना तुझे प्रीत पीस कोमल
सहन नाही होत रे मजला विरहाच्या ह्या वेदना
ये रे ये तू ये सजणा

अर्धे फुललेले मी एक कमळ मिलनाच्या सरोवरी
भ्रमरा तू पूर्ण फुलव ना सांगते मी परोपरी
मी एक शापित अभागी करिते तुजकडे याचना
ये रे ये तू ये सजणा

नाचुनी थकला रे आता प्रीत वनी आशेचा मयूर
मेघा न बरसताच का रे निघुनी गेलास तू  दूर
शिंपुनी जा रोमांचित जल ते ओढ लागली ह्या मना
ये रे ये तू ये सजणा


--प्रसाद शुक्ल

गीत छंद

गीत गाण्यात मज होई आनंद
आनंदात गाणे हाची माझा छंद

शब्दांना फुटले सुरांचे पंख
गीतांच्या आकाशी झाले ते दंग
कल्पनेत मी राजा जरी असे रंक
राणी सवे माझी प्रीत होई धुंद

कधी होते मुखातुनी निसर्गाची स्तुति
देवाच्या स्तुतिला कुंठते मती
यौवनाच्या रंगमंची कधी नाचे  रति
सोडूनी जगाचे सर्व कटू बंध

खळखळनारा झरा मला देतो साथ
कधी माझ्या साथीला समुद्राची लाट
हिरव्या रानात पक्षी घालती साद
सुरे ते  घेउनी जाई वारा तो मंद
आनंदात गाणे हाची माझा छंद

----प्रसाद शुक्ल

Monday, March 12, 2012

शिशिर पहाट

शिशिर पहाट

तो --रम्य हि शिशिर पहाट
गार गुलाबी वाहतो वात

राहू नकोस सखे तू दूर
 दाट पसरले आहे धुके
धुक्यात ह्या हरवेल ग प्रीत
नकोस डोळ्यांनी बोलू मुके
मज ओठांना दे तुज ओठांची साथ
गार गुलाबी वाहतो वात

सोनेरी किरणे येतील क्षिती
सैल करतील मखमली मिठी
मिठीतला गंध,   मोकळे बंध
प्रणयाचे घट सारे करतील रिती
जवळी ये आता दे हातात हात
गार गुलाबी वाहतो वात

ती -- पडेन खास फशी तुझ्या
भावती मदनाची आव्हाहने
शहारले अंग मनी  तरंग
तनु मध्ये फुलतात स्पंदने
दवबिंदू पडती त्या फुला पानात
गार गुलाबी वाहतो वात

तो , ती --रम्य हि शिशिर पहाट
गार गुलाबी वाहतो वात



----प्रसाद शुक्ल







सय


प्रिया चुंबिलेस तू माझे ओठ
त्या धुंद नशिल्या रे रात्री
सय आहे का तुला रे त्याची?

सांज होता फिरण्यास तू मी निघालो
गावापासुनी आपण दूर दूर गेलो
दाट झाडीतूनी काढीत मार्ग
एकांताचा गाठीला स्वर्ग
--प्रिया चुंबिलेस तू माझे ओठ

धडाड धुडूम मेघ गरजले
मी एक खुळी मनी घाबरले
तुझ्या मिठीत घेतला आसरा
आवाज हि माझा होई कापरा
--प्रिया चुंबिलेस तू माझे ओठ

रिमझिम रिमझिम होत होती बरसात
दाट काळोखात जात होती रात
नव्हत्या चांदण्या नाही रजनीनाथ
मजसी होती तुझीच ओली साथ
--प्रिया चुंबिलेस तू माझे ओठ
--प्रसाद शुक्ल

Friday, March 9, 2012

विज्ञानाचे दान

देवा तुझ्या दारी आज जमलो आम्ही सारे
मागतो दान एक देशील का सांग का रे

तुकयाने मागितले विसर न तुझा व्हावा
विश्वाचे कल्याण मागितले ज्ञानदेवा
थोर संतांच्या त्या भूमी अजून का आम्ही कोरे

विश्वची तूच आहे तू ची विश्वाचा रे कर्ता
विश्वरूप तुझे देवा रणी दाविले तू  पार्था
उघडी केलीस त्याला ज्ञानाची सर्व दारे

एकेकाळी भारतात सुवर्ण युग नांदले
वेदांमधुनी विज्ञानाचे धडे ते किती मांडले
परी आता शिकविती पश्चिमेचे ज्ञान  वारे
 
विकसनशील आम्ही, होऊ केंव्हा विकसित
बुद्धिवान ताऱ्यांची संख्या इथे आहे  अगणित
विज्ञानाचे दान घेता तेजाळतील  सारे तारे
मागतो दान हे रे देशील का सांग का रे
 
--प्रसाद शुक्ल