Thursday, March 29, 2012

माझ्या मनातील माझी कविता


जेंव्हा आमचे कवी-मित्र केदार मेहंदळे ह्यांनी माझ्या एका कवितेवर टिप्पणी केली त्याला उत्तर देताना खालील भावना मी व्यक्त केल्या


मनातील तरंग जेंव्हा शब्दात येतात
शब्द जेंव्हा छन्दोबद्ध होतात
तिथेच कविता होते  साकार
अन कागदावर घेते आकार

काही कवितांचा जन्म कल्पनेतून होतो
काही कविता आपण अनुभवलेल्या असतो
तो अनुभव स्वतःचा असेल वा भोवतालचा
असेल उद्याचा किंवा आजचा वा तो कालचा

काही कविता आपण जगलेल्या असतो
जगण्यातून कविता सुचते
कवितेतून जगणे रुचते
आणि अशी जगलेली कविता
नेहमीच मनात घर करून राहते

----प्रसाद शुक्ल

चंदेरी रात


तो: चंदेरी रात प्रिये तुझी साथ
      प्रीतीची ग बरसात साजणी
      प्रीतीची ग बरसात
ती: चंदेरी रात प्रिया तुझी साथ
      प्रीतीची रे  बरसात साजणा
      प्रीतीची रे  बरसात

तो: चांदाच्या किरणावारी झुलव शृंगाराचा तू झुला
ती: स्वच्छंदी भ्रमरापरी फुलव हलके हलके तू मला
     घेशी चुंबने अगणित जितक्या चांदण्या रे गगनात
      सखया प्रीतीची रे बरसात

तो: डोंगर कपारीत वाहती खळखळ प्रणयाचे झरे
ती: नाद हा जरी एकांती होई मन माझे रे लाजरे
      झुकती खाली पापण्या धरता मधुघट तू अधरात
      सखया प्रीतीची रे बरसात

ती:  बाहुपाशात तुझ्या तनुवरी रोमांचाची नर्तने
       नाचे यौवन मयुरी होती मिलनाची आवर्तने
तो: अशीच रजनी बहरेल जोवरी तृप्ती दिसे नयनात
      सखये प्रीतीची ग बरसात


---प्रसाद शुक्ल


     

प्रेम प्रेम प्रेम

प्रेम प्रेम प्रेम
काय ही गोष्ट असे
अनुभवा वाचुनी
ते काही कळणार नसे

प्रेम प्रेम प्रेम
बघून नाही दिसणार
ऐकावे म्हणावे तरी
श्रुतीला ना  भावणार

प्रेम प्रेम प्रेम
जिव्हेवरी चाखता न येई
गंध त्याचा नासिकेत
हुंगता जाणार नाही

प्रेम प्रेम प्रेम
कसा करणार त्यास स्पर्श
फुलवता फुलणार नाही
रोमांचाचा मनात हर्ष

प्रेम देऊ म्हटले तरी
मनासारखा घेणारा पाहिजे
प्रेम घेऊ म्हटले तरी
मनासारखा देणारा पाहिजे

घेणे-देणे वा देणे-घेणे
परिणाम ह्याचा जी अनुभूती
प्रेम बसणे प्रेम होणे प्रेम करणे
जमुनी ह्या येतात कृती
\
ह्या कृतींचे उद्दीपन
पेमिक फक्त जाणतील
प्रेमाचे अस्तित्व प्रेमाने
पंचेन्द्रीयांनी भोगतील

प्रेम प्रेम प्रेम
उमजणार नाही वाचून
एकदातरी उधळा ते
नका मनात ठेवू साचून

--प्रसाद शुक्ल

Thursday, March 22, 2012

पाळणा -२

पाळणा -२ -- आमच्या चिरंजीवांच्या बारशाच्या वेळेस -

( चाल -- भरजरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण 
                चित्रपट - श्यामची आई )


हलकेच जोजवा ग सयांनो पाळणा
पाळण्यात ठेवियला नवा पाहुणा
 
श्रावण ग मास तो, शुद्ध नवमी
पहाटेचा समय ग  तो चंद्र गगनी
सुखावली माउली ती पुत्र दर्शना
पाळण्यात ठेवियला नवा पाहुणा
 
अरुंधती बहिण ह्याची शोभे भाग्याची
पाठीवरी हिच्या मारा थाप कुंकाची
ताई म्हणविता मनी हर्ष मावेना
पाळण्यात ठेवियला नवा पाहुणा
 
दीपाच्या उदरी पहिली जन्मते ज्योती
ज्योती मागुनी किरण येई संगती
अनिरुद्ध हाचि किरण शुक्ल सदना
पाळण्यात ठेवियला नवा पाहुणा
 
सोनियाचा दिन हा, उगवला आज
पाळण्यासी चढविला सुमनांचा साज
आप्त-इष्ट जमले ह्या नामकरणा
पाळण्यात ठेवियला नवा पाहुणा
 
--प्रसाद शुक्ल
आरती -रेणुकेची

आमची कुलदेवता -रेणुका (माहूर) . शिवरायांच्या जन्मभूमी जुन्नर येथे देवीचे देऊळ आहे - ग्रामदैवत!  तेथील आम्ही पुजारी. माझ्या कडे एक जुने दस्तऐवज आहे - अर्धे मोडी लिपी मध्ये आहे व अर्धे पर्शियन भाषेत - जे मी बाबासाहेब पुरंदरे ह्यांच्याकडून वाचून घेतले.  १५५० साल चे आहे. त्यात आम्हाला बादशहाने ( during Moghul rule) जुन्नर व  आसपास च्या गावांचे पौरोहित्य करण्याचे अधिकार दिले असा मजकूर आहे.
माझा जन्म रेणुका देवीला नवस केल्याने झाला म्हणून माझे नाव प्रसाद. त्या आमच्या कुलदेवीची - रेणुकेची ही आरती.

( चाल पारंपारिक -- जय जगदीश हरे --)

जय जय रेणुके माते जय जय रेणुके
शरण मी तुझ्या चरणी, आशीर्वाद दे
जय जय रेणुके

तुझ्या रूपे लक्ष्मी, पाहतो सरस्वती
आकार तूच दे ग , आधार तूच दे ग माझ्या जीवनी
जय जय रेणुके

पुण्याचे होवोत पर्वत, पाप विलीन धरणी
तन मन धन ग माझे लागो सत-करणी
जय जय रेणुके

विसर न व्हावा तुझा मजला हीच बुद्धी देई
तुझे नाम सदा मुखी हीच इच्छा हृदयी
जय जय रेणुके

लाभो सर्वा सुख समृद्धी हीच  विनंती
करितो ग प्रसादे, परशुराम जननी
जय जय रेणुके

--प्रसाद ( उर्फ परशुराम) शुक्ल



पाळणा -१

पाळणा -१ कन्येच्या बारशाच्या वेळी  ( चाल पारंपारिक - बाळा जो जो रे)

बाळा जो जो रे, कुलभूषणा
परशुराम दुहिता, बाळा जो जो रे

लाविली दीपाने कुलज्योती, दिवाळीच्या मुहूर्ती
मिळवी तू कीर्ती , तेजाने दिपवी सारी धरती
बाळा जो जो रे

तुझ्याच वेलीवर हे अंबे, आले सुंदर फुल
सदैव राहूदे तिजवरी तव मायेची झूल
बाळा जो जो रे

लाडक्या नातीचे कौतक करी प्रभावती
दुधावरची साय म्हणोनी आजोबा तुज जपती
बाळा जो जो रे

हर्ष जाहला आजोळी, फुलली नाजूक कळी
करांच्या हिंदोळी, कौतुक प्रत्येकाचे डोळी
बाळा जो जो रे

सुमन आत्याने सांगितले नाव अरुंधती
सोनियाचे क्षण आजला कौतुके नाहिती
बाळा जो जो रे

---प्रसाद (उर्फ परशुराम ) शुक्ल

ओली चिंब तू

पावसात ह्या, ओली चिंब तू
केसात तुझ्या, झेली थेंब तू
सारीत बाजूला त्या अवखळ बटा
जाणून घेऊ दे तुझ्या नजरेतील छटा
प्रतिसाद दे मला राहुनी संग तू
पावसात ह्या, ओली चिंब तू
 
ओली वसने हि, बिलगली ग तुला
मनी उफाळला त्यांचा मत्सर मला
रेखीव तनुवरी फुललेले आकार
डोळ्यात माझ्या होती साकार
मदिरेचे पेले सहस्त्र,  ऐसी झिंग तू
पावसात ह्या, ओली चिंब तू
 
जरी हवेत गारवा   मनी  मी तापलो
घुमे मदनाचा पारवा तनी ओला जाहलो
सांगती आता तुझ्या अधरांची स्पंदने
मिठीत मोकळी कर सारी बंधने
शृंगाराच्या ऐन्यातले यौवन बिंब तू
पावसात ह्या, ओली चिंब तू
 
---प्रसाद शुक्ल