Wednesday, August 28, 2013

अवनी - पाळणा-२


नभातुनी  आली घरी एक परी पाहुणी
पाळण्यात जोजवा ग अंगाई गाउनी

विवाह समयी पहावी ती आकाशी तारका
सुगंधित तेजस्वी तारयासम मिळता तो  सखा
तेजपुंज उल्का जन्मली दिपली ग अवनी

संसाराची वेल फुलवी अरुंधती सौरभ
कळी उमलली ह्या वेलीवर बहरले वैभव
मन गेले मोहरूनी आनंदे नाहुनी

अखंडित राहो तुजवरी अंबेची ग कृपा
मागणे हे  हेचि करितो नरसिंह रे नृपा
सिद्धीविनायका होवो कन्या हि सुगुणी
नभातुनी  आली घरी एक परी पाहुणी
पाळण्यात जोजवा ग अंगाई गाउनी

---प्रसाद 

अवनी - पाळणा १

आधीच्या काही गाण्यांमध्ये आमच्या मुला साठी (अनिरुद्ध ) आणि मुली साठी (अरुंधती)  केलेले पाळणे होते. आता खालील पाळणा नाती साठी --------अवनी -अरुंधती-सौरभ ची कन्या
(चाल : भरजरी ग पितांबर दिला फाडून ---चित्रपट : श्यामची आई )

सये ग पाळणा हा हलकेच जोजवी
पाळण्यात ठेवियली पाहुणी नवी II ध्रु  II 

 मार्गशीर्ष मास कृष्ण एकादशी
चंद्र येई, गगनी सांजवात जशी
ऐश्या शुभ समयी लक्षुमीच्या पाउली
आलीस अन झाली अरुंधती माउली
कन्या ही सौरभास बहुत हर्षवी
पाळण्यात ठेवियली पाहुणी नवी
 
गोजिरे साजिरे रूप भाळी मनास
इवलेसे डोळे परी तेज तयात
मऊ मऊ बोटांचा स्पर्श तो होता
उरी वात्सल्याचा आनंद मोठा
हसून गालात ही आम्हास हसवी
पाळण्यात ठेवियली पाहुणी नवी
 
एक गालावरी बोट, एक इवल्या ओठांशी
जगी मी होणार आहे मोठी विदुषी
सांगतेस का असे? होउदेच तसे
अंबेची तुजवरी कृपादृष्टी असे
वसंतात फुललेली ही नाजूक पालवी
पाळ्यांत ठेवियली पाहुणी नवी
 
सोनियाचा दिन हा, उगवला आज
पाळण्यासी चढविला सुमनांचा साज
नामकरण सोहळा हा विश्व भुवनी
सांगती नाव हिचे ठेविले अवनी
अंगाई गात हिला माय निजवी
पाळ्यांत ठेवियली पाहुणी नवी

--प्रसाद