Wednesday, August 28, 2013

अवनी - पाळणा-२


नभातुनी  आली घरी एक परी पाहुणी
पाळण्यात जोजवा ग अंगाई गाउनी

विवाह समयी पहावी ती आकाशी तारका
सुगंधित तेजस्वी तारयासम मिळता तो  सखा
तेजपुंज उल्का जन्मली दिपली ग अवनी

संसाराची वेल फुलवी अरुंधती सौरभ
कळी उमलली ह्या वेलीवर बहरले वैभव
मन गेले मोहरूनी आनंदे नाहुनी

अखंडित राहो तुजवरी अंबेची ग कृपा
मागणे हे  हेचि करितो नरसिंह रे नृपा
सिद्धीविनायका होवो कन्या हि सुगुणी
नभातुनी  आली घरी एक परी पाहुणी
पाळण्यात जोजवा ग अंगाई गाउनी

---प्रसाद 

अवनी - पाळणा १

आधीच्या काही गाण्यांमध्ये आमच्या मुला साठी (अनिरुद्ध ) आणि मुली साठी (अरुंधती)  केलेले पाळणे होते. आता खालील पाळणा नाती साठी --------अवनी -अरुंधती-सौरभ ची कन्या
(चाल : भरजरी ग पितांबर दिला फाडून ---चित्रपट : श्यामची आई )

सये ग पाळणा हा हलकेच जोजवी
पाळण्यात ठेवियली पाहुणी नवी II ध्रु  II 

 मार्गशीर्ष मास कृष्ण एकादशी
चंद्र येई, गगनी सांजवात जशी
ऐश्या शुभ समयी लक्षुमीच्या पाउली
आलीस अन झाली अरुंधती माउली
कन्या ही सौरभास बहुत हर्षवी
पाळण्यात ठेवियली पाहुणी नवी
 
गोजिरे साजिरे रूप भाळी मनास
इवलेसे डोळे परी तेज तयात
मऊ मऊ बोटांचा स्पर्श तो होता
उरी वात्सल्याचा आनंद मोठा
हसून गालात ही आम्हास हसवी
पाळण्यात ठेवियली पाहुणी नवी
 
एक गालावरी बोट, एक इवल्या ओठांशी
जगी मी होणार आहे मोठी विदुषी
सांगतेस का असे? होउदेच तसे
अंबेची तुजवरी कृपादृष्टी असे
वसंतात फुललेली ही नाजूक पालवी
पाळ्यांत ठेवियली पाहुणी नवी
 
सोनियाचा दिन हा, उगवला आज
पाळण्यासी चढविला सुमनांचा साज
नामकरण सोहळा हा विश्व भुवनी
सांगती नाव हिचे ठेविले अवनी
अंगाई गात हिला माय निजवी
पाळ्यांत ठेवियली पाहुणी नवी

--प्रसाद 

Thursday, April 12, 2012

तृष्णेचा बळी


स्टार माझा वर काल ( ११ एप्रिल २०१२)    एक बातमी पहिली त्या बातमी वर आधारित मनात ही कविता आली. आपण हि ही बातमी पहिली तर मनास वेदना होतात. लोकांनी हेल्मेट घातलेले माकड अशी केलेली टिपणी मात्र संताप निर्माण करते.

http://www.umovietv.com/Video/watch.aspx?v=News&i=qezhuc9ZnEY&s=Yavatmal%20Monkey%20Trapped..
तृष्णेचा बळी
ऋतू चक्रातून आला तो  ग्रीष्म
नभी आग भडके तापले ते अश्म
विदर्भात  त्यातून तीव्रता ती भारी
जाळूनी जळाला  आसमंतात सारी

नदी नाले ओढे कोरडे तलाव
प्रतिवर्षी सृष्टी का खेळे हा डाव
भावी ऋतूचा जरी हा  सु हेतू
परी आता जैसे  ग्रासती राहू केतू

जीवन म्हणजे काय ह्या प्रश्ना
उत्तर सोपे लागता ती तृष्णा
एकेका थेंबासाठी  करीत पाणी पाणी
शोधाया  चहूकडे धावती सर्व प्राणी

अशाच त्यात एका मर्कटाचा तान्हुला
पिण्यासाठी पाणी व्याकूळ तो झाला
तहानलेला तो मुका बाळ जीव
गावात एका धावला ओलांडून शीव

स्वैर फिरता फिरता पोर तो रडवा
कुठेतरी दिसला एक छोटसा गडवा
पाण्याची चाहूल लागली त्यास त्यात
चार थेंबच होते साठले तळात

हुशार कावळ्याची गोष्ट नसे त्यास ज्ञात
खुपसले पाण्यासाठी अपुले तोंड गडवयात
हाय परी ह्याचा झाला  भलताच  विपर्यास
अडकले तोंड त्यात जसा पडला गळी फास

शोधत पाठी आली लेकराची ही माय
तिच्यासाठी पिल्लू दुधावरची ती साय
कसे काय सोडवू  केले बहुत  कयास
व्यर्थ परी ठरले सारे तिचे सायास

उराशी धरिले फुटला वात्सल्याचा पान्हा
गडवयासहित बिलगला आईला कान्हा
दृश्य ते पाहुनी धावले मनुष्य प्राणी
जाणिली न तिने परी त्यांच्या मदतीची वाणी

जवळी न कोणा येऊ देई जराशी
पळे दूर  बाळाला घेउनी उराशी
खाता न येई पिलाचे गडवयात तोंड
पाण्यासाठी अडकली अशी गळ्यात धोंड

असे उलटले  नऊ दिसा मागुनी दिस
दया मग आली त्या क्रूर नियतीस
जगण्याची आता व्यर्थ झाली शर्थ
निपचित झाले पिल्लू उरला न देही अर्थ

--प्रसाद शुक्ल

Thursday, March 29, 2012

माझ्या मनातील माझी कविता


जेंव्हा आमचे कवी-मित्र केदार मेहंदळे ह्यांनी माझ्या एका कवितेवर टिप्पणी केली त्याला उत्तर देताना खालील भावना मी व्यक्त केल्या


मनातील तरंग जेंव्हा शब्दात येतात
शब्द जेंव्हा छन्दोबद्ध होतात
तिथेच कविता होते  साकार
अन कागदावर घेते आकार

काही कवितांचा जन्म कल्पनेतून होतो
काही कविता आपण अनुभवलेल्या असतो
तो अनुभव स्वतःचा असेल वा भोवतालचा
असेल उद्याचा किंवा आजचा वा तो कालचा

काही कविता आपण जगलेल्या असतो
जगण्यातून कविता सुचते
कवितेतून जगणे रुचते
आणि अशी जगलेली कविता
नेहमीच मनात घर करून राहते

----प्रसाद शुक्ल

चंदेरी रात


तो: चंदेरी रात प्रिये तुझी साथ
      प्रीतीची ग बरसात साजणी
      प्रीतीची ग बरसात
ती: चंदेरी रात प्रिया तुझी साथ
      प्रीतीची रे  बरसात साजणा
      प्रीतीची रे  बरसात

तो: चांदाच्या किरणावारी झुलव शृंगाराचा तू झुला
ती: स्वच्छंदी भ्रमरापरी फुलव हलके हलके तू मला
     घेशी चुंबने अगणित जितक्या चांदण्या रे गगनात
      सखया प्रीतीची रे बरसात

तो: डोंगर कपारीत वाहती खळखळ प्रणयाचे झरे
ती: नाद हा जरी एकांती होई मन माझे रे लाजरे
      झुकती खाली पापण्या धरता मधुघट तू अधरात
      सखया प्रीतीची रे बरसात

ती:  बाहुपाशात तुझ्या तनुवरी रोमांचाची नर्तने
       नाचे यौवन मयुरी होती मिलनाची आवर्तने
तो: अशीच रजनी बहरेल जोवरी तृप्ती दिसे नयनात
      सखये प्रीतीची ग बरसात


---प्रसाद शुक्ल


     

प्रेम प्रेम प्रेम

प्रेम प्रेम प्रेम
काय ही गोष्ट असे
अनुभवा वाचुनी
ते काही कळणार नसे

प्रेम प्रेम प्रेम
बघून नाही दिसणार
ऐकावे म्हणावे तरी
श्रुतीला ना  भावणार

प्रेम प्रेम प्रेम
जिव्हेवरी चाखता न येई
गंध त्याचा नासिकेत
हुंगता जाणार नाही

प्रेम प्रेम प्रेम
कसा करणार त्यास स्पर्श
फुलवता फुलणार नाही
रोमांचाचा मनात हर्ष

प्रेम देऊ म्हटले तरी
मनासारखा घेणारा पाहिजे
प्रेम घेऊ म्हटले तरी
मनासारखा देणारा पाहिजे

घेणे-देणे वा देणे-घेणे
परिणाम ह्याचा जी अनुभूती
प्रेम बसणे प्रेम होणे प्रेम करणे
जमुनी ह्या येतात कृती
\
ह्या कृतींचे उद्दीपन
पेमिक फक्त जाणतील
प्रेमाचे अस्तित्व प्रेमाने
पंचेन्द्रीयांनी भोगतील

प्रेम प्रेम प्रेम
उमजणार नाही वाचून
एकदातरी उधळा ते
नका मनात ठेवू साचून

--प्रसाद शुक्ल

Thursday, March 22, 2012

पाळणा -२

पाळणा -२ -- आमच्या चिरंजीवांच्या बारशाच्या वेळेस -

( चाल -- भरजरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण 
                चित्रपट - श्यामची आई )


हलकेच जोजवा ग सयांनो पाळणा
पाळण्यात ठेवियला नवा पाहुणा
 
श्रावण ग मास तो, शुद्ध नवमी
पहाटेचा समय ग  तो चंद्र गगनी
सुखावली माउली ती पुत्र दर्शना
पाळण्यात ठेवियला नवा पाहुणा
 
अरुंधती बहिण ह्याची शोभे भाग्याची
पाठीवरी हिच्या मारा थाप कुंकाची
ताई म्हणविता मनी हर्ष मावेना
पाळण्यात ठेवियला नवा पाहुणा
 
दीपाच्या उदरी पहिली जन्मते ज्योती
ज्योती मागुनी किरण येई संगती
अनिरुद्ध हाचि किरण शुक्ल सदना
पाळण्यात ठेवियला नवा पाहुणा
 
सोनियाचा दिन हा, उगवला आज
पाळण्यासी चढविला सुमनांचा साज
आप्त-इष्ट जमले ह्या नामकरणा
पाळण्यात ठेवियला नवा पाहुणा
 
--प्रसाद शुक्ल