Wednesday, February 29, 2012

दख्खनची राणी

लग्न झाले तेंव्हा माझी बायको मुंबई ला नोकरी करत होती व मी पुण्यात राहत होतो.  लग्न झाल्यावर पुण्यात बदली होई पर्यंत काम आटपून ती दक्खनच्या राणीने (Deccan Queen) मुंबईहून आठवड्यातून दोन वेळा पुण्याला येत असे. व तिला आणायला मी शिवाजीनगर स्टेशन वर जात असे. असेच एके दिवशी मी गाडीची वेळ झाली म्हणून घाई घाईत स्टेशन वर गेलो व कळाले कि गाडीला उशीर होत आहे. स्टेशनवर तेंव्हा वाट पाहत मी तेथे बसलो असता खालील भावना मनात आल्या.

दख्खनची राणी

धापा टाकीत मी आलो स्टेशनात
कारभारणी घ्यायाला तुझी ग गाठ

दख्खनची राणी आज का हो झाली लेट
राणी तुझी माझी कवा होईल भेट
ओलांडला असशील का तू खंडाळ्याचा घाट
कारभारणी घ्यायाला तुझी ग गाठ

चार दिस तुझा मुक्काम मुंबईला
दोनच दिस तुझा संग पुण्याला
बदलीची आता किती पहायची वाट
कारभारणी घ्यायाला तुझी ग गाठ

Saturday, February 25, 2012

मरण

मला कसेल असेल मरण
जीवनातील तो अखेरचा क्षण

उंच उंच महालात
मऊ मऊ गादीवर
का गवताच्या झोपडीत
फाटक्या काळ्या घोंगडीवर

गजबजलेल्या रस्त्यावर
एखाद्या भीषण अपघातात
का दूर दूर जंगलात
हिंस्त्र पशूच्या तडाख्यात

एखादा दुर्धर रोग देईल मला साथ
अन निरोप देईल मला पांढरे इस्पितळ
का मित्रांमध्ये गप्पा मारता मारता
येईल एखादीच छातीत कळ

निधड्या छातीवर घाव घेऊन
देह ठेवेल रणांगणावर
का आत्महत्येचे पाप घडेल
आघात होता मनातील हळव्या स्पंदनांवर

भडकलेल्या आगीमध्ये
होरपळून भाजून
का खवळलेल्या पुरामध्ये
गुदमरून बुडून

स्नेहाचा दोरा कापेल संघर्षाची कात्री
अन होईल माझा  खून
का माझ्या हातून खून होऊन
होईल मला फाशी

विज्ञानाशी मैत्री करून
प्राण सोडेल अंतराळात
का देवाचे नाव घेत
ज्योत विझेल राउळात

कदाचित असेही असेल
नशिबी मरणच नसेल
अमृताचे घट पिऊन
अमरत्व मिळून बसेल

Friday, February 24, 2012

सावली

उंच उंच आकाशाखाली
खोल खोल समुद्र आहे
दूर दूर क्षितीजास सुर्व्या
निरोप घेत आहे

सागराच्या उरातुनी
अवखळ लाटा उचंबळत आहेत
गार सुखद वाऱ्यासवे
झावळ्या सळसळत आहेत

सोनेरी आसमंतात
चंदेरी भावना दडल्या आहेत
मऊ मऊ ह्या रेतीवारती
लांब सावल्या पडल्या आहेत

सखे तुझ्या सावलीला
नाही स्वतंत्र अस्तित्व
ती माझ्याच सावलीत
विरली आहे झरली आहे

Thursday, February 23, 2012

साकुरा

आधी थोडे ह्या कविते बद्दल --- जेंव्हा मी जपान मध्ये राहत होतो तेंव्हा साकुरा चा आनंद लुटायचा योग आला. साकुरा म्हणजे cherry blossom . हि फुले जपान मध्ये बहुतेक एप्रिल मध्ये फुलतात आणि जपानी लोकांना ह्याचा खूप अभिमान असतो. फुलांचा बहर फार तर एक आठवडा टिकतो आणि ह्या काळात जपानी लोक ह्या फुलांचा उत्सव उत्साहाने साजरा करतात. जपान ला जपानी भाषेत निहोन तर जपानी माणसाला निहोन जीन असे म्हणतात.
एक अमेरिकन संगीत प्रिय गृहस्थ आहे. भारतीय संगीत शिकून जपान मध्ये राहतात व जपानी वाद्ये उत्तम वाजवतात व स्वतः गातात हि. . ते जेंव्हा एकदा  भारतात आले होते तेंव्हा त्यांनी हि साकुरा कविता जपानी संगीतात बद्ध करून एका कार्यक्रमात म्हटली होती.

साकुरा

निहोनजीनच्या शिरावरी मानाचा तुरा
निहोनच्या भूमीवरी फुललेला साकुरा

शुभ्र हिमाचे दिन ते जाता
लज्जाचूर त्या गुलाबी कालिका
फुलवण्या त्या येई पहिला
वसंत राजा ह्या भूवारा
निहोनच्या भूमीवरी फुलतो साकुरा

साकुराच्या उपवनात जावे
डोळे भरुनी ते दृश्य पहावे
नभातुनी का मेघ उतरले
प्रेमाने लपेटण्या धरा
निहोनच्या भूमीवरी फुलाला साकुरा

साजशृंगार हा बघुनी सृष्टीचा
अधू दृष्टीचा निहोनजीन षष्ठीचा
बागडेल मोदे चहूकडे
पिउनी साके - निहोनची प्यारी सुरा
निहोनच्या भूमीवरी फुलाला साकुरा

तरुण मनाला पर्वकाल हा
वसंत उत्सव सर्वकाल हा
आवळी भोजन सम साकुरा भोजन
करुनी लुटती आनंद पुरा
निहोनच्या भूमीवरी फुलाला साकुरा

जो आवडतो सर्व जनाला
तोची आवडे हि देवाला
कटू नियम हा इथे हि लागू
बहर लगेच ओसरे लागू
हुरहूर वाटे खेळ हा अधुरा
निहोनच्या भूमीवरी फुललेला साकुरा

Wednesday, February 22, 2012

प्रतीक्षा


तुझी  किती प्रतीक्षा
सूर्य गेला क्षितिजा

तुझी किती मी वाट पाहिली
सांगेल तुजला इथली रेती
क्षणभर हि नाही लवली
तुज्या प्रतीक्षेत डोळ्यांची पाती
नको पाहू हि कठीण परीक्षा

पुर्वेकडूनी रजनी ती आली
पश्चिमेस हि संध्या आली
तू ये अशी माज्या सामोरी
लाटा ह्या उसळती सागरी
करण्यास  आपुल्या प्रेमाची समीक्षा

तुझी  किती प्रतीक्षा
सूर्य गेला क्षितिजा

Monday, February 20, 2012

विज्ञान अभंग

मराठी ब्लॉग वर आत्तापर्यंत केलेल्या कविता, गाणी प्रकाशित कराव्यात असे बरेच दिवस मनात होते पण वेळ आणि मुहूर्त मिळत नव्हता.  प्रथम कोणते गाणे / कोणती कविता प्रकाशित करावी संभ्रम पडला। शेवटी मी बरीच वर्षे शास्त्रन्य म्हणून काम करत असल्याने माझा "विज्ञान अभंग " प्रथम येथे लिहावा असे ठरवले.
सदर अभंग हा -- माझे Ph D चे प्रथम गुरु डॉ माशेलकर हे जेह्वा आमच्या संस्थेचे निर्देशक झाले व त्यांनी जे संस्थे मधे प्रथम भाषण केले - त्यावर आधारित आहे.

( माझा हा प्रथम प्रयत्न असल्याने मराठी मधे टाइप करताना काही शब्द बरोबर येत नाहीत तरी समजुन घ्यावे ही विनंती )

विज्ञान अभंग
विज्ञानाचा घ्यावा ध्यास
विज्ञानाचा घ्यावा श्वास
विज्ञानात करा वास
युग हे विज्ञानाचे ॥ ध्रु ॥

कठीण श्रमाने, विज्ञानाचे घेता धड़े
अमृताचे घड़े बहु, लागतील हाती ॥ १॥

शोध कार्य करण्या, व्हावे तुम्ही अगतिक
मिळो  कीर्ति जागतिक, असो ध्येय मनी ॥ २॥

खरा गुरु आहे , विज्ञानाचा ग्रन्थ
दाखविण्या सुपंथ, सदैव हज़र ॥ ३॥

गुरु जे वदले, केले मी कथन
करावे जतन तुम्ही, प्रसाद म्हणे ॥ ४॥