Saturday, February 25, 2012

मरण

मला कसेल असेल मरण
जीवनातील तो अखेरचा क्षण

उंच उंच महालात
मऊ मऊ गादीवर
का गवताच्या झोपडीत
फाटक्या काळ्या घोंगडीवर

गजबजलेल्या रस्त्यावर
एखाद्या भीषण अपघातात
का दूर दूर जंगलात
हिंस्त्र पशूच्या तडाख्यात

एखादा दुर्धर रोग देईल मला साथ
अन निरोप देईल मला पांढरे इस्पितळ
का मित्रांमध्ये गप्पा मारता मारता
येईल एखादीच छातीत कळ

निधड्या छातीवर घाव घेऊन
देह ठेवेल रणांगणावर
का आत्महत्येचे पाप घडेल
आघात होता मनातील हळव्या स्पंदनांवर

भडकलेल्या आगीमध्ये
होरपळून भाजून
का खवळलेल्या पुरामध्ये
गुदमरून बुडून

स्नेहाचा दोरा कापेल संघर्षाची कात्री
अन होईल माझा  खून
का माझ्या हातून खून होऊन
होईल मला फाशी

विज्ञानाशी मैत्री करून
प्राण सोडेल अंतराळात
का देवाचे नाव घेत
ज्योत विझेल राउळात

कदाचित असेही असेल
नशिबी मरणच नसेल
अमृताचे घट पिऊन
अमरत्व मिळून बसेल

No comments:

Post a Comment