Thursday, February 23, 2012

साकुरा

आधी थोडे ह्या कविते बद्दल --- जेंव्हा मी जपान मध्ये राहत होतो तेंव्हा साकुरा चा आनंद लुटायचा योग आला. साकुरा म्हणजे cherry blossom . हि फुले जपान मध्ये बहुतेक एप्रिल मध्ये फुलतात आणि जपानी लोकांना ह्याचा खूप अभिमान असतो. फुलांचा बहर फार तर एक आठवडा टिकतो आणि ह्या काळात जपानी लोक ह्या फुलांचा उत्सव उत्साहाने साजरा करतात. जपान ला जपानी भाषेत निहोन तर जपानी माणसाला निहोन जीन असे म्हणतात.
एक अमेरिकन संगीत प्रिय गृहस्थ आहे. भारतीय संगीत शिकून जपान मध्ये राहतात व जपानी वाद्ये उत्तम वाजवतात व स्वतः गातात हि. . ते जेंव्हा एकदा  भारतात आले होते तेंव्हा त्यांनी हि साकुरा कविता जपानी संगीतात बद्ध करून एका कार्यक्रमात म्हटली होती.

साकुरा

निहोनजीनच्या शिरावरी मानाचा तुरा
निहोनच्या भूमीवरी फुललेला साकुरा

शुभ्र हिमाचे दिन ते जाता
लज्जाचूर त्या गुलाबी कालिका
फुलवण्या त्या येई पहिला
वसंत राजा ह्या भूवारा
निहोनच्या भूमीवरी फुलतो साकुरा

साकुराच्या उपवनात जावे
डोळे भरुनी ते दृश्य पहावे
नभातुनी का मेघ उतरले
प्रेमाने लपेटण्या धरा
निहोनच्या भूमीवरी फुलाला साकुरा

साजशृंगार हा बघुनी सृष्टीचा
अधू दृष्टीचा निहोनजीन षष्ठीचा
बागडेल मोदे चहूकडे
पिउनी साके - निहोनची प्यारी सुरा
निहोनच्या भूमीवरी फुलाला साकुरा

तरुण मनाला पर्वकाल हा
वसंत उत्सव सर्वकाल हा
आवळी भोजन सम साकुरा भोजन
करुनी लुटती आनंद पुरा
निहोनच्या भूमीवरी फुलाला साकुरा

जो आवडतो सर्व जनाला
तोची आवडे हि देवाला
कटू नियम हा इथे हि लागू
बहर लगेच ओसरे लागू
हुरहूर वाटे खेळ हा अधुरा
निहोनच्या भूमीवरी फुललेला साकुरा

No comments:

Post a Comment