Thursday, March 29, 2012

माझ्या मनातील माझी कविता


जेंव्हा आमचे कवी-मित्र केदार मेहंदळे ह्यांनी माझ्या एका कवितेवर टिप्पणी केली त्याला उत्तर देताना खालील भावना मी व्यक्त केल्या


मनातील तरंग जेंव्हा शब्दात येतात
शब्द जेंव्हा छन्दोबद्ध होतात
तिथेच कविता होते  साकार
अन कागदावर घेते आकार

काही कवितांचा जन्म कल्पनेतून होतो
काही कविता आपण अनुभवलेल्या असतो
तो अनुभव स्वतःचा असेल वा भोवतालचा
असेल उद्याचा किंवा आजचा वा तो कालचा

काही कविता आपण जगलेल्या असतो
जगण्यातून कविता सुचते
कवितेतून जगणे रुचते
आणि अशी जगलेली कविता
नेहमीच मनात घर करून राहते

----प्रसाद शुक्ल

चंदेरी रात


तो: चंदेरी रात प्रिये तुझी साथ
      प्रीतीची ग बरसात साजणी
      प्रीतीची ग बरसात
ती: चंदेरी रात प्रिया तुझी साथ
      प्रीतीची रे  बरसात साजणा
      प्रीतीची रे  बरसात

तो: चांदाच्या किरणावारी झुलव शृंगाराचा तू झुला
ती: स्वच्छंदी भ्रमरापरी फुलव हलके हलके तू मला
     घेशी चुंबने अगणित जितक्या चांदण्या रे गगनात
      सखया प्रीतीची रे बरसात

तो: डोंगर कपारीत वाहती खळखळ प्रणयाचे झरे
ती: नाद हा जरी एकांती होई मन माझे रे लाजरे
      झुकती खाली पापण्या धरता मधुघट तू अधरात
      सखया प्रीतीची रे बरसात

ती:  बाहुपाशात तुझ्या तनुवरी रोमांचाची नर्तने
       नाचे यौवन मयुरी होती मिलनाची आवर्तने
तो: अशीच रजनी बहरेल जोवरी तृप्ती दिसे नयनात
      सखये प्रीतीची ग बरसात


---प्रसाद शुक्ल


     

प्रेम प्रेम प्रेम

प्रेम प्रेम प्रेम
काय ही गोष्ट असे
अनुभवा वाचुनी
ते काही कळणार नसे

प्रेम प्रेम प्रेम
बघून नाही दिसणार
ऐकावे म्हणावे तरी
श्रुतीला ना  भावणार

प्रेम प्रेम प्रेम
जिव्हेवरी चाखता न येई
गंध त्याचा नासिकेत
हुंगता जाणार नाही

प्रेम प्रेम प्रेम
कसा करणार त्यास स्पर्श
फुलवता फुलणार नाही
रोमांचाचा मनात हर्ष

प्रेम देऊ म्हटले तरी
मनासारखा घेणारा पाहिजे
प्रेम घेऊ म्हटले तरी
मनासारखा देणारा पाहिजे

घेणे-देणे वा देणे-घेणे
परिणाम ह्याचा जी अनुभूती
प्रेम बसणे प्रेम होणे प्रेम करणे
जमुनी ह्या येतात कृती
\
ह्या कृतींचे उद्दीपन
पेमिक फक्त जाणतील
प्रेमाचे अस्तित्व प्रेमाने
पंचेन्द्रीयांनी भोगतील

प्रेम प्रेम प्रेम
उमजणार नाही वाचून
एकदातरी उधळा ते
नका मनात ठेवू साचून

--प्रसाद शुक्ल

Thursday, March 22, 2012

पाळणा -२

पाळणा -२ -- आमच्या चिरंजीवांच्या बारशाच्या वेळेस -

( चाल -- भरजरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण 
                चित्रपट - श्यामची आई )


हलकेच जोजवा ग सयांनो पाळणा
पाळण्यात ठेवियला नवा पाहुणा
 
श्रावण ग मास तो, शुद्ध नवमी
पहाटेचा समय ग  तो चंद्र गगनी
सुखावली माउली ती पुत्र दर्शना
पाळण्यात ठेवियला नवा पाहुणा
 
अरुंधती बहिण ह्याची शोभे भाग्याची
पाठीवरी हिच्या मारा थाप कुंकाची
ताई म्हणविता मनी हर्ष मावेना
पाळण्यात ठेवियला नवा पाहुणा
 
दीपाच्या उदरी पहिली जन्मते ज्योती
ज्योती मागुनी किरण येई संगती
अनिरुद्ध हाचि किरण शुक्ल सदना
पाळण्यात ठेवियला नवा पाहुणा
 
सोनियाचा दिन हा, उगवला आज
पाळण्यासी चढविला सुमनांचा साज
आप्त-इष्ट जमले ह्या नामकरणा
पाळण्यात ठेवियला नवा पाहुणा
 
--प्रसाद शुक्ल
आरती -रेणुकेची

आमची कुलदेवता -रेणुका (माहूर) . शिवरायांच्या जन्मभूमी जुन्नर येथे देवीचे देऊळ आहे - ग्रामदैवत!  तेथील आम्ही पुजारी. माझ्या कडे एक जुने दस्तऐवज आहे - अर्धे मोडी लिपी मध्ये आहे व अर्धे पर्शियन भाषेत - जे मी बाबासाहेब पुरंदरे ह्यांच्याकडून वाचून घेतले.  १५५० साल चे आहे. त्यात आम्हाला बादशहाने ( during Moghul rule) जुन्नर व  आसपास च्या गावांचे पौरोहित्य करण्याचे अधिकार दिले असा मजकूर आहे.
माझा जन्म रेणुका देवीला नवस केल्याने झाला म्हणून माझे नाव प्रसाद. त्या आमच्या कुलदेवीची - रेणुकेची ही आरती.

( चाल पारंपारिक -- जय जगदीश हरे --)

जय जय रेणुके माते जय जय रेणुके
शरण मी तुझ्या चरणी, आशीर्वाद दे
जय जय रेणुके

तुझ्या रूपे लक्ष्मी, पाहतो सरस्वती
आकार तूच दे ग , आधार तूच दे ग माझ्या जीवनी
जय जय रेणुके

पुण्याचे होवोत पर्वत, पाप विलीन धरणी
तन मन धन ग माझे लागो सत-करणी
जय जय रेणुके

विसर न व्हावा तुझा मजला हीच बुद्धी देई
तुझे नाम सदा मुखी हीच इच्छा हृदयी
जय जय रेणुके

लाभो सर्वा सुख समृद्धी हीच  विनंती
करितो ग प्रसादे, परशुराम जननी
जय जय रेणुके

--प्रसाद ( उर्फ परशुराम) शुक्ल



पाळणा -१

पाळणा -१ कन्येच्या बारशाच्या वेळी  ( चाल पारंपारिक - बाळा जो जो रे)

बाळा जो जो रे, कुलभूषणा
परशुराम दुहिता, बाळा जो जो रे

लाविली दीपाने कुलज्योती, दिवाळीच्या मुहूर्ती
मिळवी तू कीर्ती , तेजाने दिपवी सारी धरती
बाळा जो जो रे

तुझ्याच वेलीवर हे अंबे, आले सुंदर फुल
सदैव राहूदे तिजवरी तव मायेची झूल
बाळा जो जो रे

लाडक्या नातीचे कौतक करी प्रभावती
दुधावरची साय म्हणोनी आजोबा तुज जपती
बाळा जो जो रे

हर्ष जाहला आजोळी, फुलली नाजूक कळी
करांच्या हिंदोळी, कौतुक प्रत्येकाचे डोळी
बाळा जो जो रे

सुमन आत्याने सांगितले नाव अरुंधती
सोनियाचे क्षण आजला कौतुके नाहिती
बाळा जो जो रे

---प्रसाद (उर्फ परशुराम ) शुक्ल

ओली चिंब तू

पावसात ह्या, ओली चिंब तू
केसात तुझ्या, झेली थेंब तू
सारीत बाजूला त्या अवखळ बटा
जाणून घेऊ दे तुझ्या नजरेतील छटा
प्रतिसाद दे मला राहुनी संग तू
पावसात ह्या, ओली चिंब तू
 
ओली वसने हि, बिलगली ग तुला
मनी उफाळला त्यांचा मत्सर मला
रेखीव तनुवरी फुललेले आकार
डोळ्यात माझ्या होती साकार
मदिरेचे पेले सहस्त्र,  ऐसी झिंग तू
पावसात ह्या, ओली चिंब तू
 
जरी हवेत गारवा   मनी  मी तापलो
घुमे मदनाचा पारवा तनी ओला जाहलो
सांगती आता तुझ्या अधरांची स्पंदने
मिठीत मोकळी कर सारी बंधने
शृंगाराच्या ऐन्यातले यौवन बिंब तू
पावसात ह्या, ओली चिंब तू
 
---प्रसाद शुक्ल

Tuesday, March 20, 2012

पहिली भेट


सांग रे सांग रे मना
फुले का बहरली, चंद्र का हासला
थांब रे थांब रे मना
आसमंत हा मज स्वर्ग का भासला

हे कोकिळे हे कोकिळे
संगीताच्या डहाळीवर एक गा ग गोड गीत
रस वाटू दे ग त्याला माझ्या प्रीत संगतीत
पहिलीच माझी त्याची भेट घडे हि आजला

अग सरिते अग सरिते
खळखळून धावू नको मन माझे हि धावते
गोंधळून गेले कि मी माझी न मी राहते
आधीच माझा  जीव गोड भीतीने ग्रासला

रे राजहंसा रे राजहंसा
प्रेमात त्याच्याशी मी बोलू रे कसे
दृष्टीला लावूनी दृष्टी, का लाजतसे
सांग न लवकरी जवळी तो आला

---प्रसाद शुक्ल

अभागी मी


जा जा जा रे रातच्या राजा जा
जेथे असेल प्रीतीची बरसात
तेथे तू जा

होती माझ्या भाळ अंगणी
चमचम करीत एक चांदणी
पुनवेच्या ह्या शीतल रात्री
नाही फक्त तीच एकटी
तू हि जा तू हि जा रातच्या राजा जा

उजाड ह्या डोंगर माथी
वाट पाहू मी कोणासाठी
तुटलेल्या ह्या फांदीवरती
रानफुले हि येत नसती
गुलाबाच्या रे सुंदर फुला
तुही सुकून जा सुकून जा

---प्रसाद शुक्ल

अल्लड प्रेम

तो: प्रेम बसले माझे तुझ्यावर
     तुझे माझ्यावर मी काय करू

ती:   त्या चांदण्या अन सागर मोती
       राजा तू घेउनी ये हाती
       हट्ट करणारी मी ती राणी 
       आता तूच माझा रे कल्पतरू
      काय करू काय काय करू
      प्रेम बसले माझे तुझ्यावर
     तुझे माझ्यावर मी काय करू

तो: हि रात्र सुंदर , तुही सुंदर
     बोलावतो सुंदर समिंदर
     मऊ मऊ ह्या रेतीवारुनी
     आपण दोघे खूप फिरू
    काय करू काय काय करू

तो ती : प्रेम बसले माझे तुझ्यावर
      तुझे माझ्यावर मी काय करू

---प्रसाद शुक्ल
     

निधन

प्राण्यांनाही भावना आहेत --

मरुनी पडता आपुली कलत्र
अश्रू ढाळती मुके दोन नेत्र

उमजत नाही का हि मेली
एकलीच स्वर्गामध्ये गेली
सोडूनी माझे छत्र

जन्मभरी दिधली मज प्रीती
जगाच्या रंगभूमी वरती
गळाले हे एक पात्र

--प्रसाद शुक्ल

Monday, March 19, 2012

लग्न ठरल्यावर


किती दिवस अजुनी मी बोलावे तुझ्या प्रतीमेसवे
दिनरात तुज स्वप्नी पहावे का ते ठरावे वावगे

त्या दिनी आला होतास पाहण्यास तू मला
तुजकडे बघण्याचा मजसी धीर न रे झाला
खाली मान घालूनी तुझ्या सामोरी मी बैसले
उंचावूनी पापण्या तरी एकदाच तुला पाहिले
तेंव्हाच आले रे मनी तुझीच होऊनी मी जावे

मनात माझ्या भरले तुझे ते व्यक्तिमत्व देखणे
छंद फक्त आताची तो मज  संसाराचे चित्र रेखणे
नयनात तुझ्या मी आता जेंव्हा पाहते एकटक
भेटण्यास तुजसी सखया मन होते रे अगतिक
पाहण्यास मी अधीर झाले गोड गुलाबी विश्व नवे

वाचते आता मी कधी एखादी सुरस प्रणय कथा
ती तुझी-माझीच आहे असे वाटते मजसी नाथा
लाजुनी हसते मनी मी आता ऐकता प्रेमगीत
वाटे त्या गीतातुनी वर्णिली तुझी माझी प्रीत
उडती मनाच्या गगनात, स्वच्छंदी स्वप्नांचे रे थवे


--प्रसाद शुक्ल


लावणी: गुलाब

राया गेल्या श्रावणात, खास येउनी लाडात
तुम्ही दिल माझ्या हातात एक कलम गुलाबाच
जपून नेल मी घरी, लावलं पुढच्या दारी
नित्य ओतल्या घागरी, खत घातलं प्रेमाच
झाल आता वर्ष , सांगण्यास होतो हर्ष
सुखावतो रोज स्पर्श बहरलेल्या ताटव्याचा
सय येती तुमची फार तुम्ही याव एकवार
पाणी गुलाबच गार अन ठेविला फाया अत्तराचा

राया या हो एकदा घरी
नजर टाकावी गुलाबावरी  -धृ

येता तुम्ही अंगणात गुलाब भरेल नजरेत
येईल तुमच्या मनात हळूच लावावा हात
रंग लाल मोहक परी छटा थोडी त्यात केशरी
राया या हो --

टपोर एखाद फुल घालेल तुम्हासी भूल
टाकुनी पुढती पाऊल तोडाव तुम्ही खुशाल
घ्यावी खबरदारी तरी झाड आहे ते काटेरी
राया या हो --

एकदा पहाव गुलाबाकडे, एकदा हो मजकडे
मग भाव मनी दडे दोन्ही वरी प्रीत हो जडे
खोचावा  माझ्या केसात आवडेल तुम्हाला भारी
राया या हो --

---प्रसाद शुक्ल


Thursday, March 15, 2012

अंगाई - नीज

माझ्या चिमुकल्या कन्येसाठी --आणि हो नंतर माझ्या चिमुकल्या चिरंजीवास हि म्हणत असे

चांदण्यांचा थवा बाई जमला ग गगनात
नीज लाडके तू आता किती हाससी गालात

सकाळीच येई दारी चिवचिव करी जी चिमणी
घरट्यात गेली ती ग मिटे डोळ्यांची पापणी
घेई पिलाल्या आपल्या उबदार ती पंखात
नीज लाडके तू आता किती हाससी गालात

दिसभर बागडूनी मनीमाऊ ती दमली
कोपऱ्यात जाऊनीया अंग चोरून निजली
मावशी ग ती वाघाची राहतो जो वनात
नीज लाडके तू आता किती हाससी गालात

झुलावती ग फुलांना वेलीवरची ती पाने
नभातून चंद्र त्यांना गाई अंगाईचे गाणे
गवताच्या पात्यावारी वारा नाचतो तालात
नीज लाडके तू आता किती हाससी गालात

इवल्या इवल्या डोळ्यातुनी पुरे पाहणे ते आता
अजून तू जागी कशी जग सारे झोपी जाता
रमुनी तू जाई बाई गोड सुंदर स्वप्नात
नीज लाडके तू आता किती हाससी गालात



---प्रसाद शुक्ल

अंगाई : पाहुणी

आमच्या छोट्याश्या घरात -आमच्या कन्येचे आगमन झाले तेंव्हा ---

कार्तिक शुद्ध द्वितीयेला , दिवाळीच्या संध्याकाली
घरट्यात चिमुकल्या एका पाहुणी नवी हो आली
जो जो जो बाळा जो जो जो

लपलेल्या किरणाशी जोडण्यास नूतन नाती
दीपाच्या उदरी पहिली जन्मली तेजोमय ज्योती
हिच्या दिव्या प्रकाशात अवघी अवनी ती दिपली
घरट्यात चिमुकल्या एका पाहुणी नवी हो आली
जो जो जो बाळा जो जो जो

ते गोजिरवाणे रूप बघतची राहावे वाटे
भावना वात्सल्याची अंतरी उफाळून दाटे
आनंद  तो स्वर्गीचा स्पर्शता बोटे ती इवली
घरट्यात चिमुकल्या एका पाहुणी नवी हो आली
जो जो जो बाळा जो जो जो

आजीआजोबांची हिजवरी आभाळा एवढी माया
चांदण्यात कौतुकाच्या उजळते नाजूक काया
हिज चुंबी वरचेवरी पदरी घेई माउली
घरट्यात चिमुकल्या एका पाहुणी नवी हो आली
जो जो जो बाळा जो जो जो

मऊ कापसाची गादी निजण्यास हिजसाठी
ठेविली डोईखाली मखमली  उशी  ती छोटी
रंगीत पाळण्यास रेशीम दोरी बांधिली
 घरट्यात चिमुकल्या एका पाहुणी नवी हो आली
जो जो जो बाळा जो जो जो

--प्रसाद शुक्ल

डोहाळे

सोहळा हा माझा डोहाळे पुरवायला
सयांनो मी निघाले ग माहेराला

हिरवी चोळी हिरवी साडी
भरली फुलांची ग वाडी
सासू आली माझी ओटी भरायला
सयांनो मी निघाले ग माहेराला

गालावर लाली नाही
पांढरे ग ओठ बाई
आळस हा अतिशय अंगात ग भरला
सयांनो मी निघाले ग माहेराला

भजी केली घोसाळ्याची
कोशिंबीर ती कांद्याची
मोतीचूर पंगतीला ग वाढीला
सयांनो मी निघाले ग माहेराला

आप्त इष्ट सारे जमती
आनंदे कौतुक करिती
अंबेच्या कृपेने सोनियाचा दिस दिसला
सयांनो मी निघाले ग माहेराला

---प्रसाद शुक्ल

एक सुंदर भेट

आमच्या पहिल्या बाळाची चाहूल बायको कडून जेंव्हा समजली - तेंव्हा सुचलेली हि कविता

तुला मी देणार आहे रे
एक सुंदर भेट
हृदयाशी तू धरशील सखया
अनेक चुंबने घेत

गुलाब कालिके परी ती मोहक
लाख हिर्‍यांहूनी ती रे मौलिक
पुढील स्वप्नांची ती प्रेरक
सांगितल्या विन  तू रे ओळख
गोड गुपित आहे ते माझे
सांगू कसे तुज थेट
तुला मी देणार आहे रे
एक सुंदर भेट

लाडे लाडे म्हणोनी साजणी
केली होती मज जवळी मागणी
ओढुनी परी लज्जेची ओढणी
अबोल राहिले मी त्या क्षणी
अजुनी जरा धीर धर रे
लवकरीच तुझ्या हाती आहे देत
हृदयाशी तू धरशील सखया
अनेक चुंबने घेत

---प्रसाद शुक्ल



लावणी : धो धो पावसात


काळ काळ ढग जमल निळ्या आभाळात
इजा कडाडल्या गरजले मेघ
पावसाने बाई धरला जोर ओढे खळखळ वाहिती
एकली मी बाई रानात झाले चिंब ओलेती
थरथरू लागले अंग अन भीती भरली नयनात
नाही कुणाची साथ मला ह्या धो धो पावसात
नाही कुणाची साथ मला ह्या धो धो पावसात

कोरस 1 : अहो नाही कुणाची साथ हिला ह्या धो धो पावसात
कुणी जा हिच्या गावा, धाडा सांगावा हिच्या हो रावा
नसे हा कावा , नाही कांगावा लवकरी राया हिचा हो यावा

किती वेळ अशी उभी राहू मी आंब्याखाली एकली
आजच नेमकी नाही आली सोबतीला सहेली
थकले माझे डोळे पाहुनी सखयाची ग वाट
नाही कुणाची साथ मला ह्या धो धो पावसात
कोरस 1

शोषला माझा कंठ, राया तुला मारू किती हाक
मावळतीला दिसू लागली आता रातची झाक
उजळू लागली मनात काळोखाच्या भीतीची वात
नाही कुणाची साथ मला ह्या धो धो पावसात
कोरस 1

मंद सुंगंध कुठूनी आला दरवळला ग चाफा
गवताच्या सळसळीतूनी वाजाती घोड्यांच्या टापा
सुटले ग मी बाई , सख्याची स्वारी भरली नयनात
नाही कुणाची साथ मला ह्या धो धो पावसात
कोरस 1

अलगद बसवील मला संगती त्याने  उमद्या घोड्यावर
अन तो हि चालू लागला टपाटपा गावाच्या वाटेवर
ओली प्रीत आज दौडली ग ओल्या हिरव्या रानात
मिळाली रायाची मज साथ ह्या धो धो पावसात

कोरस२:  रायाची मिळाली साथ हिला ह्या धो धो पावसात
            
----प्रसाद शुक्ल

तुझ्या सहवासात

प्रिये तू जाऊ नकोस दूर
वाटेल हुरहूर तुझ्या विरहाची
तुजविन नाही मज
येणार नीज तळमळ होईल रातीची

तुझ्या निळ्या निळ्या नयनात
पाहता त्या ऐन्यात मीच ग मला
विसरुनी जाते देहभान, जगाची नच जाण
खरच सांगतो तुला

हाती घेता तुझा ग हात
माझ्या अंगात उठती धुंद लहरी
ओठ गुलाबी ते चुंबिता प्यावे जसे अमृता
वाटते ग सुंदरी

केसांमध्ये माळता मोगरा
आणखीच होई साजरा एक चेहरा लाजरा
थोडा लटका तो बावरा जणू ती अप्सरा
आली या भूवरा

लाडे लाडे एक खुले कळी
नाक ते चाफेकळी उडवी पाहुनी मजकडे
मग हसू येई मनात गुलाबी गालात
गोड खळी पडे

रुपेरी चांदण्यात माझ्या बाहूत
जेंव्हा तू शिरसी
एक आगळ्या धुंदीत वेगळ्या विश्वात
नेसी तू मजसी

असता तुझी ग साथ
केंव्हा सरे रात मज न कळे
लाल होई पूर्वेवर तुझ्या हि गालावर
रक्तमा खेळे

---प्रसाद शुक्ल

Wednesday, March 14, 2012

कोजागिरी


ती : कोजागिरीची रात आहे धुंद, जागवू चल प्रिया
तो : नभीच्या चांदाला साथ देण्याचा मनी तू कर हिय्या

तो : कालचा दिवस आज तू विसर
       उद्याची पहाट अजुनी ग दूर
        सुरात तालात गुंफव  हि रात
        आताच्या क्षणांची भोग रया

ती   नभाने  फुलवुनी शरदाच चांदण
       आजला धरेला दिलया आंदण
        पुनवेच उधाण येउनी ऊरात
         नाचतो हि हा  चंदेरी दर्या

तो  चराचरात चेतना,  निद्रा तू सावर
ती   लक्ष्मी विचारी इथे को जागर
तो ती : चंदेरी धरती चंदेरी आकाश
            आजला आपुली हीच शय्या
नभीच्या चांदाला साथ देण्याचा मनी तू कर हिय्या

होऊनी बेधुंद , उधळूया आनंद
नाचूया स्वच्छंद, तनी मनी चांदण्याचा ठिय्या
नभीच्या चांदाला साथ देण्याचा मनी तू कर हिय्या

---प्रसाद शुक्ल

Tuesday, March 13, 2012

निरोप

मी जेंव्हा पहिल्यांदाच परदेशी - अमेरिकेस गेलो होतो -तेंव्हा माझे वडील आजारी होते - मी एकुलता एक असल्याने त्यांना काळजी वाटत होती . आमचे कन्यारत्न फक्त दोनच महिन्यांचे होते. तेंव्हा internet तर नाहीच पण फोन सुविधा पण फार प्रगत नव्हती.   त्यावेळेस लिहिलेली ही कविता आहे

चाललो मी परदेशी, निरोप तुमचा घेतो
साऱ्या शुभेच्छा तुमच्या संगे मी घेउनी जातो

चाललो मी परदेशी  रडता असे का  तात
सहाच महिन्यांनी कि येणार आहे मी परत

चाललो मी परदेशी, काळजी ती नाही कशाची
असता पाठीमागे हो माझी माय धीराची

चाललो मी परदेशी, सांगतो मम प्रिय कांता
मम हृदयातील तव स्मृती तारून नेईल भ्रमंता

आपुल्या हाती ग आला फणसाचा मधुर हा कापा
ओठांवरी राहील माझ्या त्याचाच सदैव पापा

चाललो मी परदेशी अंबे तव स्पर्शितो चरण
धावुनी तू येई माते करताच तुझे ग स्मरण

चाललो मी परदेशी, निरोप तुमचा घेतो
साऱ्या शुभेच्छा तुमच्या संगे मी घेउनी जातो


----प्रसाद शुक्ल

सावज

तुझ्या चंचल मनाचे अखेर
मी हि एक सावज रे

तुजकडे बघुनी यौवन फुलले
तुझ्या मधुर शब्दांना भुलले
दिनरात तुझ्या कवेत झुलले
घेउनी मातेचा शाप
एकलेच ते आता रे

का धरावा तुजवरी मी रोष
देते मी माझ्या मनास दोष
का पडला त्यास प्रणयाचा शोष
माहित असुनी धावले ते
मृगजळा कडे रे

ठेवुनी तुझ्या वर फुका विश्वास
तुझ्या श्वासात मिसळला मी श्वास
रोखू न शकले वासनेच्या अश्वास
ठेउनी मागे पाऊल खुणा
दौडत पुढे गेला रे

---प्रसाद शुक्ल

शापित मधुचंद्र

काही वर्षांपूर्वी भावना ह्या दिवाळी अंकात -माझी "तृप्ती"  ही कथा प्रकाशित झाली होती. त्या कथेवर सुचलेले हे गीत आहे.

ये रे ये तू ये सजणा अधीर मी झाले रे सजणा
तूच माझी पूर्ण कर रे अंतरीची कामना
ये रे ये तू ये सजणा

पहिल्या रात्री गगनी होती चंद्राची अर्धी कला
मधुचंद्र हि तो अर्धा सखया राहिला रे आपला
कोंडल्या हृदयात माझ्या प्रणयाच्या अगतिक भावना
ये रे ये तू ये सजणा

तू माझा रे मी तुझी रे मंगल मणी माझ्या गळा
प्राजक्ताच्या फुलापरी स्वप्ने मी केली गोळा
वाहू मी ती आता कोणा सांग रे तुझ्या विना
ये रे ये तू ये सजणा

अंगार फुलविते आता ते पुनवेच चांदण शीतल
एकदाच मजवरुनी फिरव ना तुझे प्रीत पीस कोमल
सहन नाही होत रे मजला विरहाच्या ह्या वेदना
ये रे ये तू ये सजणा

अर्धे फुललेले मी एक कमळ मिलनाच्या सरोवरी
भ्रमरा तू पूर्ण फुलव ना सांगते मी परोपरी
मी एक शापित अभागी करिते तुजकडे याचना
ये रे ये तू ये सजणा

नाचुनी थकला रे आता प्रीत वनी आशेचा मयूर
मेघा न बरसताच का रे निघुनी गेलास तू  दूर
शिंपुनी जा रोमांचित जल ते ओढ लागली ह्या मना
ये रे ये तू ये सजणा


--प्रसाद शुक्ल

गीत छंद

गीत गाण्यात मज होई आनंद
आनंदात गाणे हाची माझा छंद

शब्दांना फुटले सुरांचे पंख
गीतांच्या आकाशी झाले ते दंग
कल्पनेत मी राजा जरी असे रंक
राणी सवे माझी प्रीत होई धुंद

कधी होते मुखातुनी निसर्गाची स्तुति
देवाच्या स्तुतिला कुंठते मती
यौवनाच्या रंगमंची कधी नाचे  रति
सोडूनी जगाचे सर्व कटू बंध

खळखळनारा झरा मला देतो साथ
कधी माझ्या साथीला समुद्राची लाट
हिरव्या रानात पक्षी घालती साद
सुरे ते  घेउनी जाई वारा तो मंद
आनंदात गाणे हाची माझा छंद

----प्रसाद शुक्ल

Monday, March 12, 2012

शिशिर पहाट

शिशिर पहाट

तो --रम्य हि शिशिर पहाट
गार गुलाबी वाहतो वात

राहू नकोस सखे तू दूर
 दाट पसरले आहे धुके
धुक्यात ह्या हरवेल ग प्रीत
नकोस डोळ्यांनी बोलू मुके
मज ओठांना दे तुज ओठांची साथ
गार गुलाबी वाहतो वात

सोनेरी किरणे येतील क्षिती
सैल करतील मखमली मिठी
मिठीतला गंध,   मोकळे बंध
प्रणयाचे घट सारे करतील रिती
जवळी ये आता दे हातात हात
गार गुलाबी वाहतो वात

ती -- पडेन खास फशी तुझ्या
भावती मदनाची आव्हाहने
शहारले अंग मनी  तरंग
तनु मध्ये फुलतात स्पंदने
दवबिंदू पडती त्या फुला पानात
गार गुलाबी वाहतो वात

तो , ती --रम्य हि शिशिर पहाट
गार गुलाबी वाहतो वात



----प्रसाद शुक्ल







सय


प्रिया चुंबिलेस तू माझे ओठ
त्या धुंद नशिल्या रे रात्री
सय आहे का तुला रे त्याची?

सांज होता फिरण्यास तू मी निघालो
गावापासुनी आपण दूर दूर गेलो
दाट झाडीतूनी काढीत मार्ग
एकांताचा गाठीला स्वर्ग
--प्रिया चुंबिलेस तू माझे ओठ

धडाड धुडूम मेघ गरजले
मी एक खुळी मनी घाबरले
तुझ्या मिठीत घेतला आसरा
आवाज हि माझा होई कापरा
--प्रिया चुंबिलेस तू माझे ओठ

रिमझिम रिमझिम होत होती बरसात
दाट काळोखात जात होती रात
नव्हत्या चांदण्या नाही रजनीनाथ
मजसी होती तुझीच ओली साथ
--प्रिया चुंबिलेस तू माझे ओठ
--प्रसाद शुक्ल

Friday, March 9, 2012

विज्ञानाचे दान

देवा तुझ्या दारी आज जमलो आम्ही सारे
मागतो दान एक देशील का सांग का रे

तुकयाने मागितले विसर न तुझा व्हावा
विश्वाचे कल्याण मागितले ज्ञानदेवा
थोर संतांच्या त्या भूमी अजून का आम्ही कोरे

विश्वची तूच आहे तू ची विश्वाचा रे कर्ता
विश्वरूप तुझे देवा रणी दाविले तू  पार्था
उघडी केलीस त्याला ज्ञानाची सर्व दारे

एकेकाळी भारतात सुवर्ण युग नांदले
वेदांमधुनी विज्ञानाचे धडे ते किती मांडले
परी आता शिकविती पश्चिमेचे ज्ञान  वारे
 
विकसनशील आम्ही, होऊ केंव्हा विकसित
बुद्धिवान ताऱ्यांची संख्या इथे आहे  अगणित
विज्ञानाचे दान घेता तेजाळतील  सारे तारे
मागतो दान हे रे देशील का सांग का रे
 
--प्रसाद शुक्ल

Thursday, March 8, 2012

हुरहूर

हुरहूर

धुंद त्या गोड स्मृती ठेवुनी मजपाशी
सजणा तू का रे निघूनी गेलास दूरदेशी

भेट तुझी माझी झालीच  नसती तर
वाटली नसती मनास उगाच ही हुरहूर
मन माझे रातदिन घुटमळते तुजपाशी

नाही सहन होत विरह हा आता मजला
अगतिक झाली  काया बिलगण्या तव तनुला
लवकरी येउनी, मज तुज्या बाहूत घेशी

सांग नाहीतर विसरुनी जा ती प्रीत
वचने ती खोटी दिली क्षणिक प्रणयात
धरणार मी हि नाही आशा खुळी उराशी
सजणा तू का रे निघूनी गेलास दूरदेशी

--प्रसाद शुक्ल

स्वप्नातील सुंदरी


एक सुंदरी आली काल स्वप्नात
गाढ झोपेत तरी वाटे सत्यात
जागविले तिने आपल्या हाताने
फिरवुनी नाजूक बोटे माझ्या केसात
एक सुंदरी आली काल स्वप्नात

नजरेला नजर माझ्या लाविली
गोऱ्या गालात हळूच ती हासली
माझेच मला काही कळेना
बघतच राहिलो तिच्या डोळ्यात

माझ्या गालावर टीचकी मारिली
मजकडे थोडी खाली ती वाकली
चेहरा तो माझा झाकून गेला
तिच्या रेशमी सुंगंधी केशभारात

एक हात माझा तिने धरिला
संगे चलण्याचा इशारा केला
चालू लागलो मी हि तिच्या सवे
तिच्या कटी भवती टाकुनी  हात

गेलो आम्ही स्वर्गीच्या प्रीतवनात
होता तिथे एक उंच प्रपात
धावतच जाऊनी उभे राहिलो
खाली झेपावणाऱ्या शुभ्र धारेत

तिची  विरल वस्त्रातली काया
ओली बिलगली तनुला माझिया
भ्रमरापरी स्वछंदी झालो
घेउनी मधुघट अधरात

मग उचलुनी तिला घेतले
बकुळीच्या तरुतळी ठेवले
फुलांच्या शेजेवर सुकाविले
माझ्या बाहूत चंद्राच्या उन्हात

--प्रसाद शुक्ल

Monday, March 5, 2012

पहिली रात

हि पहिली रात
सजली सुरात
मिलनाचे हि गीत गात
हि पहिली रात

कालच्या त्या मंगल दिनी
झालो मी तुझा धनी
चाललीस तू मज मागुनी
सप्तपदीची पाऊले सात


तू का अशी लाजवंती कळी
फुलवितो फुलात ये जवळी
तने मनें धुंद झाली
फुलाच्या सुवासात
हि पहिली रात

Sunday, March 4, 2012

लटिका राग

प्रिये फुलली हि वाटिका
सुंदर हि घटिका
दूर उभी राहुनी
अबोल तू अशी का

नुकतीच बरसली श्रावणसर
सोनेरी उन्हे पसरली भूवर
फुलांवर पानांवर मनावर
सुगंधात मृत्तिका

तुझ्यासवे कसे बोलावे
ह्या रागाला काय म्हणावे
का असे रोखुनी बघावे
फुगवुनी नासिका

फुल डोलते वाऱ्यासंगे
भ्रमारासावे प्रणय रंगे
प्रीतीच्या गुजगोष्टीत दंगे
तरुसवे लतिका

किती वेळ राहणार अजुनी
तळहाती हनुवटी ठेवुनी
मधेच हसते ओठ दाबुनी
सोड राग हा लटिका

कृष्ण जन्म

नभी गरजती मेघ बरसती हो श्रावण धारा
अष्टमीच्या रात्रीला मोहन अवतरला भूवरा

हंबरती गोमाता त्यांचा आला गोपाळ
मंजुळ स्वरात धरिला बासरीने ताल
एक सुंदर पीस टाकले कळले त्या मयूरा

टिपरी वरी पडे टिपरी नाचती आनंदे गोपिका
पायातल्या नृपुराने धरिला कृष्ण नामाचा ठेका
धरिला शाम नामाचा ठेका
रासक्रीडेत रंग भरण्य येई शामसुंदरा

वाट पाहती सवंगडी रे वाट पाहे भाकर काला
पेंद्या म्हणे गौळणीला आला गोविंदा आला
बघू कशी खाते आता दही लोणी ती मथुरा
अष्टमीच्या रात्रीला मोहन अवतरला भूवरा

वसुदेवाकीचा कान्हा आला
यशोदेचा नंदलाला आला
पार्थाचा सारथी तो आला
सुदाम्याच जिवलग हा आला
मीरेचा गिरीधर हो आला
जगी सर्वत्र मोद जाहला


Friday, March 2, 2012

नागपंचमी


एक नवविवाहित युवती नागपंचमी च्या सणासाठी एकटी  माहेरी आली असते. सण झाल्यावर ती परत सासरी चालली आहे.  तिची जिवलग मैत्रीण तिला निरोप देण्यासाठी गावाच्या वेशी पर्यंत आली आहे आणि तेंव्हा ती युवती तिच्या मैत्रिणीस सांगत आहे --



सखे ग बाई, निरोप मज देई
मी आता ग माझ्या घरी जाई, सखे बाई

नागपंचमी, येऊन गेली ग, झाले चार दिस
मन माझे सये, झाल वेडापिस, भेटण्या पतीस
सखे ग बाई

तू काढलेली, रंगली मेंदी ग, माझ्या हातावर
दाखवता प्रियास, आवडेल फार, चुंबिल तो कर
सखे ग बाई

तिकडे ग तो, बैचेन मजसाठी, असेल राजा
नको ग फार त्याला, विरहाची सजा
मला हि त्याची इजा, सखे बाई
सखे ग बाई

दिवाळीच्या सणा, येईल मी जेंव्हा, पुन्हा माहेरी
असेल तो बरोबरी, सांगते खरोखरी
फिर तू माघारी सखे  बाई
सखे ग बाई


Thursday, March 1, 2012

लावणी : पुनवेच चांदन

फार दिसांची इच्छा माझी राया मी तुम्हा सांगते
तुमच्या  माझ्या प्रीतीला सखया  पुनवेच चांदन पिउदे

कोरस - आता लवकरात लवकरी, सजणा  यावे झडकरी
             हिन ध्यास धरला उरी, तुम्ही इच्छा करावी पुरी
             माझ्या सजणा तू र  माझ्या राया तू र

नटून थटून येईल मी सजणा तुमच्या बरोबरी
चंद्रकोर कुकवाची कोरेल माझ्या गोऱ्या भाळावरी
अंगाला मी नेसेल तुमचा आवडता शालू भरजारी
गळ्यात घालेल मी माझ्या साज सोन्याचा कोल्हापुरी
तुमच्या संगे किरणात चांदाच्या शृंगार माझा  नाहुदे
तुमच्या  माझ्या प्रीतीला सखया  पुनवेच चांदन पिउदे


भाळीतो मजला तुमचा हा मर्दानी रुबाब
फिके पडतील तुमच्या पुढती दिल्लीचे नवाब
संगतीत तुमच्या सखया गालावरती फुलती गुलाब
धुंद चढविते मजला तुमच्या श्वासांची मस्त शराब
शिणगाराचा फुलुनी पिसारा मोर मनीचा  नाचूदे
तुमच्या  माझ्या प्रीतीला सखया  पुनवेच चांदन पिउदे