Wednesday, March 14, 2012

कोजागिरी


ती : कोजागिरीची रात आहे धुंद, जागवू चल प्रिया
तो : नभीच्या चांदाला साथ देण्याचा मनी तू कर हिय्या

तो : कालचा दिवस आज तू विसर
       उद्याची पहाट अजुनी ग दूर
        सुरात तालात गुंफव  हि रात
        आताच्या क्षणांची भोग रया

ती   नभाने  फुलवुनी शरदाच चांदण
       आजला धरेला दिलया आंदण
        पुनवेच उधाण येउनी ऊरात
         नाचतो हि हा  चंदेरी दर्या

तो  चराचरात चेतना,  निद्रा तू सावर
ती   लक्ष्मी विचारी इथे को जागर
तो ती : चंदेरी धरती चंदेरी आकाश
            आजला आपुली हीच शय्या
नभीच्या चांदाला साथ देण्याचा मनी तू कर हिय्या

होऊनी बेधुंद , उधळूया आनंद
नाचूया स्वच्छंद, तनी मनी चांदण्याचा ठिय्या
नभीच्या चांदाला साथ देण्याचा मनी तू कर हिय्या

---प्रसाद शुक्ल

No comments:

Post a Comment