Tuesday, March 13, 2012

शापित मधुचंद्र

काही वर्षांपूर्वी भावना ह्या दिवाळी अंकात -माझी "तृप्ती"  ही कथा प्रकाशित झाली होती. त्या कथेवर सुचलेले हे गीत आहे.

ये रे ये तू ये सजणा अधीर मी झाले रे सजणा
तूच माझी पूर्ण कर रे अंतरीची कामना
ये रे ये तू ये सजणा

पहिल्या रात्री गगनी होती चंद्राची अर्धी कला
मधुचंद्र हि तो अर्धा सखया राहिला रे आपला
कोंडल्या हृदयात माझ्या प्रणयाच्या अगतिक भावना
ये रे ये तू ये सजणा

तू माझा रे मी तुझी रे मंगल मणी माझ्या गळा
प्राजक्ताच्या फुलापरी स्वप्ने मी केली गोळा
वाहू मी ती आता कोणा सांग रे तुझ्या विना
ये रे ये तू ये सजणा

अंगार फुलविते आता ते पुनवेच चांदण शीतल
एकदाच मजवरुनी फिरव ना तुझे प्रीत पीस कोमल
सहन नाही होत रे मजला विरहाच्या ह्या वेदना
ये रे ये तू ये सजणा

अर्धे फुललेले मी एक कमळ मिलनाच्या सरोवरी
भ्रमरा तू पूर्ण फुलव ना सांगते मी परोपरी
मी एक शापित अभागी करिते तुजकडे याचना
ये रे ये तू ये सजणा

नाचुनी थकला रे आता प्रीत वनी आशेचा मयूर
मेघा न बरसताच का रे निघुनी गेलास तू  दूर
शिंपुनी जा रोमांचित जल ते ओढ लागली ह्या मना
ये रे ये तू ये सजणा


--प्रसाद शुक्ल

No comments:

Post a Comment